झेंडू, शेवंतीच्या भावात वाढ
पुणे – गणेशोत्सवामुळे वाढलेली मागणी आणि पावसामुळे घटलेल्या आवकमुळे झेंडूच्या फुलांना शनिवारी उच्चांकी भाव मिळाला. तर, शेवंतीच्या भावातही वाढ झाली. झेंडूला किलोस 100 ते 300 रुपये, तर शेवंतीला किलोस 150 ते 300 रुपये भाव मिळाल्याचे फुल विभागप्रमुख प्रदीप काळे आणि व्यापारी सागर भोसले यांनी सांगितले.
मुळातच करोनाचा फटका फुलांच्या लागवडीला बसला आहे. बाजार मिळेल की नाही, या शंकेने शेतकऱ्यांनी फुलांची लागवड कमी केली आहे. त्यामुळे नेहमीच्या तुलनेत आवक कमीच होत आहे. करोनामुळे मागणीही कमी आहे. गणेशोत्सवामुळे मागील दोन-तीन दिवसांत फुलांना मागणी वाढली आहे.
नेहमीच्या तुलनेत मागणी कमी असली तरीही, मागणीच्या तुलनेत बाजारात फुलांचा तुटवडा होता. त्यामुळे भाव तेजीत असल्याचे काळे यांनी सांगितले. तर, शुक्रवारी झेंडूस किलोस 100 ते 200 रुपये, शेवंतीस 200 रुपये भाव मिळाला. शनिवारी आणखी आवक घटली. त्यामुळे भावात वाढ झाली. बाजारात दाखल होणाऱ्या मालामध्ये 10 ते 20 टक्के खराब मालाचे प्रमाण आहे. गेल्या वर्षी बाजारात फुलांची आवक जास्त होती. शनिवारी असलेल्या भावापेक्षा निम्मे भाव फुलांना मिळत होते, असे भोसले यांनी सांगितले.