‘त्या’ वयातही वंशाच्या दिव्यासाठी तिचा छळ

– संदीप घिसे

पिंपरी – एक मुलगा आणि एक मुलगी, पती शासकीय सेवेत कामाला, सर्वकाही आनंदात सुरू होते. मात्र नियतीला त्यांचे हे सुख मान्य नसावे. हाताशी आलेल्या मुलाचे अचानक अपघाती निधन झाले. यामुळे वयाच्या 42 व्या वर्षीय पतीने वंशाच्या दिव्यासाठी तिच्यावर दबाव आणला. प्रयत्न करूनही वंशाल दिवा मिळत नसल्याने थेट दुसऱ्या लग्नाचा घाट घातला. पतीचे दुसरे लग्न उधळून लावल्याने त्रासात आणखीच भर पडली. अखेर महिला सहाय्य कक्षाकडे धाव घेतल्यानंतर पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे आता त्यांचा संसार पुन्हा सुखाने सुरू झाला आहे.

विष्णू आणि सरिता (काल्पनिक नावे) यांचा विवाह झाला. पती शासकीय सेवेत शिक्षक म्हणून कामाला होता. एक मुलगा आणि एक मुलगी झाल्यावर पत्नीची कुटूंब नियोजनाची शस्त्रकिया झाली. 2015 मध्ये मुलाने दहावीची परिक्षा दिली. त्यांच्या आत्याच्या मुलीचे लग्न असल्याने तो गावी गेला आणि तिथेच त्याचे अपघाती निधन झाले. यामुळे त्या कुटूंबावर मोठा आघात झाला. हुषार असलेल्या त्यांच्या मुलाला दहावीत 92 टक्‍के गुण मिळाले होते. आपल्या वंशाला दिवा पाहिजे म्हणून शिक्षक पती अडून बसला. आपल्याला मुलगी असून तिच्याकडे बघूनच आपण आयुष्य काढू, असे पत्नीचे म्हणणे होते. पती मात्र आपल्या म्हणण्यावर ठाम राहिला. 35 वर्षानंतर मुल होणे आई आणि मुलाच्या दृष्टीने धोकादायक असते, हे डॉक्‍टरांनी सांगितले. पतीच्या इच्छेखातर तिने कुटूंब नियोजनाची शस्त्रक्रिया पुन्हा उसविली. मुलासाठी खूप प्रयत्न केले. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. त्यानंतर टेस्ट ट्यूब बेबीचाही पर्याय चाचपण्यात आला. मात्र त्यातही अपयश आले.

आपल्याला वंशाचा दिवा हवाच म्हणून विष्णूने सरिताकडे दुसऱ्या लग्नाची इच्छा व्यक्‍त केली. मात्र सरिताने त्यांला जोरदार विरोध केला. पत्नीचा विरोध पाहून विष्णूने गावाकडे गुपचूप दुसरे लग्न ठरविले. त्यास विष्णूच्या वडिलांचीही साथ होती. मात्र सरिताच्या वडिलांना ही बाब समजल्यावर त्यांनी लग्नाच्या दिवशी गावी जाऊन जावयाच्या लग्नाचा बेत उधळून लावला. यामुळे संतापलेल्या विष्णूने सरिता हिचा वंशाच्या दिव्यासाठी आणखीनच छळ सुरू केला. मला दुसऱ्या लग्नासाठी लेखी परवानगी दे, असे म्हणून तो सातत्याने छळ करीत होता. मात्र सरिता यांनी आपल्याला मुलगी असून मुलांपेक्षा सध्या मुलीच आई वडिलांचा सांभाळ करतात, असे सांगितले. मात्र वंशाच्या दिव्यासाठी हट्टाला पेटलेला विष्णू काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.

दिवसेंदिवस वाढत जाणारा छळ असहाय्य झाल्याने अखेर सरिता यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्‍तालयातील महिला सहाय्य कक्षाकडे अर्ज केला. सरिताच्या अर्जानंतर पोलीस उपनिरीक्षक मनिषा दशवंत यांच्या सूचनेनुसार पोलीस हवालदार प्रभावती गायकवाड आणि अनिता जाधव यांनी पती विष्णूला बोलविले. समुपदेशक वंदना जगताप-मांढरे यांनी सरिता आणि विष्णू या दोघांचीही बाजू ऐकून घेतली. त्यावेळी विष्णू याने आपला मुलगा गमावल्याचे सांगत वंशासाठी दिवा किती महत्वाचा आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला. जर पत्नी वंशाला दिवा देऊ शकत नसेल तर तिने दुसऱ्या लग्नाची परवानगी द्यावी, अशी मागणी विष्णूने पोलिसांकडे केली. पोलिसांनी त्यास मुलगा मुलगी भेद नसल्याचे पटवून देण्याचा प्रयत्न केला. याशिवाय दत्तक मुलाचाही पर्याय समोर ठेवला मात्र विष्णू ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. दुसरे लग्न केल्यास तुझी नोकरी जाऊ शकते. याशिवाय तुरूंगवासही होईल, हे पटवून सांगितल्यावर त्यांच्या डोक्‍यात प्रकाश पडला आणि त्यानंतर वंशाच्या दिव्याचा आग्रह त्याने सोडला. आता त्यांचा सुखाचा संसार सुरू आहे.

मुलगा आणि मुलगी असा भेदभाव राहिलेला नाही, असे आपण नेहमी म्हणतो. प्रत्येक क्षेत्रात महिला चकमकदार कामगिरी करीत आहेत. असे असताना आजही वंशाच्या दिव्यासाठी विवाहितेचा छळ केला जात आहे. जन्माला येण्याआधीच मुलीला गर्भात मारले जात आहे. यामुळे मुलगा आणि मुली यांच्या जन्मदरात आजही मोठी तफावत आहे. जनजागृती आणि कायद्याचा बडगा उगारूनही ही तफावत दूर होत नाही हेच आपण दुर्दैव आहे. असे असले तरी पती आणि पत्नीमधील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केल्यास संसार यशस्वी होऊ शकतो. गरज आहे ती पती आणि पत्नीने एकमेकांना समजून घेण्याची आणि आग्रह सोडण्याची.

Leave A Reply

Your email address will not be published.