हॅमिल्टन: सलामीवीर रोरी बर्न्सचे शतक (101 धावा, 15 चौकार) आणि कर्णधार ज्यो रूटचे नाबाद शतक (114 धावा, 14 चौकार) अशी समाधानकारक कामगिरी असूनही मधल्या फळीतील फलंदाजांचे अपयश इंग्लंडला सतावत आहे. न्यूझीलंडच्या पहिल्या डावातील 375 धावांच्या आव्हानासमोर पाहुण्या इंग्लंडला दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवस अखेर 5 बाद 269 धावाच करता आल्याने इंग्लंडच्या अडचणी वाढल्या आहेत.
सलामीवीर टॉम लॅथमचे शतक व रॉस टेलर (53), ब्रॅडली वॅटलिंग (55) आणि डॅरिल मिशेल (73) यांच्या अर्धशतकांच्या मदतीने न्यूझीलंडने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात सर्वबाद 375 धावा करत वर्चस्व राखले. न्यूझीलंडला फलंदाजी देण्याचा इंग्लंडचा निर्णय चुकला. पहिल्या दिवशी जित रावल व कर्णधार केन विल्यमसन बाद झाल्यानंतरही लॅथम व टेलर यांनी शतकी भागीदारी केली व संघाला समाधानकारक स्थिती मिळवून दिली होती. इंग्लंडकडून स्टुअर्ट ब्रॉडने 73 धावांत 4 तर क्रिस वोक्सने 83 धावांत 3 विकेट्स घेतल्या होत्या.
इंग्लंडचा सलामीवीर रोरी बर्न्सने सावध खेळ करत आपल्या फलंदाजीची चुणूक दाखवून दिली. मात्र दुसरीकडून डॉम सिब्ले आणि ज्यो डेन्ले यांना प्रत्येकी चारच धावा करता आल्या. कर्णधार रुटने जबाबदारीने खेळ करत बर्न्स आणि बेन स्टोक्स (26) डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र स्टोक्स पाठोपाठ झॅक क्राऊलीही झटपट बाद झाल्याने इंग्लंडची स्थिती बिकट झाली.
संक्षिप्त धावफलक : न्यूझीलंड : पहिला डाव – सर्वबाद 375 (टॉम लॅथम 105, डॅरिल मिशेल 73; स्टुअर्ट ब्रॉडने 4/73). इंग्लंड पहिला डाव : 5 बाद 269 (रोरी बर्न्स 101, ज्यो रूट नाबाद 114; टीम साऊदी 63/2).
आयसीसी कसोटी मानांकनासाठी चुरस आयसीसी कसोटी मानांकनामध्ये यजमान न्यूझीलंडचे 60 तर इंग्लंडकडे 56 गुण असून, अधिकाधिक सामने मोठ्या फरकाने जिंकून गुण वाढवण्याची पराकाष्ठा दोन्ही संघ करत आहेत. मात्र, या क्रमवारीत भारतीय संघ 360 गुणांसह अव्वल स्थानावर असून एकेकाळी बलाढ्य आणि अपराजित समजला जात असलेला ऑस्ट्रेलियाचा संघ 116 गुण मिळवून दुसऱ्या क्रमांकावर आहे. म्हणजे पहिल्या दोन संघांतच 244 गुणांचे अंतर आहे. तर श्रीलंकेसह उर्वरीत संघांची एकूण बेरीज अवघी 176 होत असल्याने हा 244 गुणांचा फरक ओलांडून कोणी भारताला नमवू शकेल, असे चित्र नाही.