लोणंद -लोणंदपासून अवघ्या आठ किलोमीटरवरील तरडगावात करोनाबाधित युवती सापडल्याने लोणंदकरांच्या काळजाचा ठोकाच चुकला आहे. करोना अगदीच उंबरठ्यावर येऊन ठेपल्याची भावना लोणंदकरांच्या मनात झाल्याने गावान एकत्र येऊन लोणंद शहर पुढील निर्णय घेईपर्यंत पूर्णपणे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.
लोणंद शहर उद्यापासून म्हणजेच दि. 17 एप्रिलपासून पुढील आदेश येईपर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहे. दुग्ध व्यवसाय सकाळी 8 ते 9 याच वेळेतच सुरू राहील. इतर वेळी दुधाचे दुकान बंद राहणार आहे. दुकानमालकाने दिलेल्या वेळेत दुध घरी पोहचवण्याची सोय करायची आहे. वैद्यकीय सेवा सुरू राहतील आणि मेडिकल दुकान सरकारी आदेशानुसार दिलेल्या वेळेत सुरू राहतील.
म्हणजेच 22 एप्रिलपासून प्रत्येक प्रभागात त्या प्रभागाचे नगरसेवक आवश्यकतेनुसार स्वयंसेवक नेमण्याची व ते स्वयंसेवक ठराविक वेळेत त्या प्रभागातील नागरिकांना औषधे, भाजीपाला, किराणा आदी आवश्यक वस्तू पुरवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. शहरात कोणीही दुचाकी व चारचाकी घेऊन फिरणार नाही, फिरल्यास पोलीसांनी वाहनावर गुन्हा दाखल करावा, असा ठराव सर्वानुमते करण्यात आला. बाहेरगावातून लोणंदमध्ये येणाऱ्या रुग्णाला सोबत एक व्यक्ती घेऊन येण्यास परवानगी देण्यात आली आहे. संत निरंकारी मंडळाच्यावतीने 30 स्वयंसेवक लोणंद शहरासाठी देण्यात येणार आहेत.
बारामती पॅटर्नप्रमाणे आखणी
लोणंद लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पार्श्वभूमीवर लोणंद मेडिकल व केमिस्ट असोसिएशन, तालुका आरोग्य अधिकारी अविनाश पाटील, नगरपंचायतीचे सीईओ हेमंत ढोकले यांच्या संयुक्त बैठकीमध्य सर्व डॉक्टर नियमित ओपीडी व संलग्न मेडिकल सकाळी दहा ते दुपारी एकपर्यंत सुरू ठेवण्याचे ठरले. आपत्कालीन वैद्यकिय सेवा पूर्णवेळ सुरू असणार आहेत. बारामती पॅटर्नप्रमाणे लोणंदमध्ये 17 प्रभागात प्रत्येकी एका डॉक्टरची नियुक्ती केली असून त्या डॉक्टरने त्या प्रभागातील नगरसेवकांशी समन्वय साधून लोकांना वैद्यकीय सेवा, फोनवरून सल्ला आदी गोष्टी करायच्या आहेत, असे असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मिलिंद काकडे यांनी सांगितले. लोणंदमध्ये भविष्यात कोव्हिड केअर सेंटरची संकल्पना अविनाश पाटील यांनी मांडली.