सातारा – केंद्र शासनाच्या पुढाकाराने केंद्रीय कामगार कल्याण मंत्रालयाच्यावतीने कार्यान्वित करण्यात आलेल्या इएसआय हॉस्पिटलचे घोडे अजूनही फाईल बंद अवस्थेत आहे. येथील सातारा एमआयडीसीमध्ये जागा उपलब्ध होत नसल्याने हॉस्पिटलचे घोडे पुढे सरकेनासे झाले आहे. कामगार हॉस्पिटलला कोणती जागा द्यावयाची यावर अद्यापही खल सुरू असून यावर लवकरात लवकर मार्ग निघावा, अशी अपेक्षा उद्योजकांकडून व्यक्त होत आहे.
सातारा एमआयडीसीच्या समस्या आणि त्यावर करावयाच्या उपायोजना याबाबत सातत्याने उहापोह सुरू आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी साताऱ्यात येऊन एमआयडीसीचे प्रादेशिक कार्यालय तसेच स्वतंत्र अग्निशमन दल या विविध योजनांकरता कोट्यवधी रुपयाचा निधी मंजूर केला होता. मात्र, काही राजकीय आणि तांत्रिक कारणास्तव अद्यापही या योजना कागदोपत्रीच रांगत असल्याचे चित्र आहे. सातारा औद्योगिक वसाहतीसाठी जाहीर झालेल्या इएसआय हॉस्पिटलची सुद्धा हीच अवस्था आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री भूपेंद्र राणा यांनी जून 2023 मध्ये महाराष्ट्रातील पंधरा शहरांमध्ये ईएसआय हॉस्पिटलची घोषणा केली होती. या योजनेचे सातारा जिल्ह्यात उत्स्फूर्त स्वागत झाले. मात्र, प्रत्यक्षात सातारा एमआयडीसीतील कोणती जागा द्यावयाची यावर अद्याप खल सुरू आहे. कारण सातारा औद्योगिक वसाहतीमध्ये बंद पडलेले उद्योग बरेच असून त्यांच्या जागा हस्तांतरण करण्यामध्ये अडचणी येत आहेत.
हॉस्पिटलसाठी पाच एकर जागेची आवश्यकता आहे आणि या इएसआय हॉस्पिटलचा औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या सुमारे साडेपाच ते सात हजार कामगारांना फायदा होणार आहे. सातारा औद्योगिक वसाहतीने सातारा दूध डेअरी संघाच्या जागेला पसंती दिली आहे. मात्र, अद्याप सातारा दूध महासंघाच्या शासकीय जागेसंदर्भातील निर्णय मंत्रालय पातळीवर प्रलंबित आहे. सातारा मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनच्यावतीने सातत्याने या प्रकल्पासाठी पाठपुरावा केला जात आहे. मात्र, राज्यामध्ये सत्तानाट्याचे राजकीय हेलकावे सुरू आहेत. यामुळे महत्त्वाकांक्षी प्रकल्प लांबणीवर पडत असल्याची स्थिती आहे.
लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे…
खासदार उदयनराजे भोसले यांचे केंद्रात तर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे राज्य सरकारमध्ये चांगलेच वजन आहे. दोन्ही लोकप्रतिनिधींनी या प्रश्नात विशेष लक्ष घातल्यास हा प्रश्न निकाली निघू शकतो. दुग्ध विकास महामंडळ व केंद्रीय कामगार कल्याण मंडळ या दोन विभागात चर्चा होऊन धोरणात्मक निर्णय तत्काळ होणे अपेक्षित आहे. साताऱ्याच्या इएसआय हॉस्पिटलच्या जागेबाबतचा धोरणात्मक निर्णय लवकरात लवकर व्हावा, अशी अपेक्षा साताऱ्यातील उद्योजक व्यक्त करीत आहेत.