पुणे – “आयुष्मान भारत’ पंतप्रधान जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यायासाठी लाभार्थींनी ऑनलाइन नोंदणी करावी. त्यांनी आयुष्मान भारत गोल्डन कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे. या योजने अंतर्गत रुग्णालयात दाखल झालेल्या लाभार्थीला प्रति कुटुंब 5 लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा मिळतो. ही केंद्र सरकारची आरोग्य विमा योजना 23 सप्टेंबर 2018 पासून राज्यात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसोबत एकत्रित सुरू आहे.
पाच लाख रुपयांपर्यंतच्या रुग्णालयीन खर्चाचा लाभ कुटुंबातील एक किंवा सर्व सदस्य घेऊ शकतात. या योजनेत 1 हजार 209 शस्त्रक्रिया, चिकित्सा, उपचार समाविष्ट आहे. जिल्ह्यात 57 खासगी, 12 शासकीय रुग्णालयांचा समावेश. https://aapkedwarayushman.pmjay.gov.in/AapkeDwar/ या संकेतस्थळावर लाभार्थी यादी उपलब्ध.
सव्वाचार लाख जणांनी काढले कार्ड
जिल्ह्यात या योजनेचे एकूण पात्र लाभार्थी 16 लाख 88 हजार 687 आहेत. पण, आतापर्यंत केवळ 4 लाख 26 हजार 373 जणांनी आयुष्मान भारत गोल्डन कार्ड काढले आहे. ही खूप महत्त्वाची आरोग्य योजना असून सर्व पात्र लाभार्थींनी आयुष्मान भारत कार्ड तयार करुन घेणे आवश्यक आहे.
ऑनलाइन कार्ड काढता येणार
गोल्डन कार्ड काढण्यासाठी https://bhenificary.nha.gov.in हे पोर्टल तयार करण्यात आले आहे. यामध्ये लाभार्थी स्वत: कार्ड काढू शकतो. तसेच आशा सेविकांनादेखील हे कार्ड काढण्यासाठी लॉग-इन आयडी देण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यात 1 हजार 999 आशा सेविकांमार्फत कार्ड काढता येणार आहे.