पिंपरी- निसर्ग चक्री वादळामुळे पिंपरी चिंचवड शहरातील 250 हून अधिक झाडे पडली आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचे नुकसान झाल्याने पर्यावरण प्रेमींना दुःख झाले. मात्र यातून पुन्हा भरारी घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. ज्या ठिकाणी झाड पडून खड्डा झाला आहे. त्या खड्ड्यात आंबा किंवा फसणाच्या बिया टाकण्यात येणार आहे. यामुळे येत्या पावसाळ्यात या बियांपासून रोप तयार होईल.
पिंपरी चिंचवड शहरात निसर्ग चक्री वादळामुळे शहरातील 250 हून अधिक झाडे पडल्याची नोंद महापालिकेच्या दप्तरी आहे. शहरात बहुतेक विदेशी झाडे कोसळली असून देशी झाडांचे कोसळण्याचे प्रमाण तुलनेत कमी आहे. ज्या ठिकाणी वड, पिंपळ अशी देशी झाडे पडली आहेत. त्या ठिकाणी जाऊन पर्यावरण प्रेमी या झाडांच्या फांद्यांपासून नवीन झाडे तयार करण्याच्या कामाला लागले आहेत.
महापालिका किंवा स्वयंसेवी संस्था वृक्षारोपण करताना नर्सरीतून पाच ते सहा फूट उंचीची झाडे खरेदी करतात. या झाडांच्या उंचीवर त्यांची किंमत ठरली जाते. मात्र अनेक नर्सरी चालक या मोठ्या झाडांची मुळे पसरू देत नाहीत. यामुळे अशा मोठ्या वृक्षांचे रोपण केल्यास त्याची मुळे खोलवर जात नाहीत. अशी झाडे वादळी वाऱ्यामध्ये तग धरीत नाहीत. याउलट बियांपासून तयार झालेल्या झाडांची मुळे पाण्याच्या शोधात जमीनीमध्ये खोल जातात. अशी झाडे मोठ्या वादळातही तग धरून राहतात.
कोणती आणि कशी पडली झाडे
पर्यावरण प्रेमींनी केलेल्या पाहणीत पडलेल्या झाडांमध्ये विदेशी झाडांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. विदेशी शोभिवंत झाडे खूपच कुमकुवत असतात आणि वादळांमध्ये तग धरु शकत नाहीत. यामुळे विदेशी झाडांवर पक्षी देखील आपली घरटी बांधत नाहीत. तसेच ही झाडे अधिक उपयुक्त ठरत नाहीत. परंतु बुधवारी आलेल्या वादळी वाऱ्यांमध्ये काही देशी झाडेही कोसळली. या झाडांच्या पडण्यामागचे कारणही पर्यावरणप्रेमींनी शोधले आहे. ज्या देशी झाडांच्या मुळापर्यंत पाणी पोहचण्यासाठी जागाच ठेवलेली नाही, अशी झाडे मोठ्या प्रमाणात पडली आहेत. झाडांच्या बुंध्याभोंवती केलेले रस्ते आणि फूटपाथसाठी केलेले कॉंक्रिटीकरण झाडांसाठी काळ ठरले.
“पिंपरी चिंचवड शहरात पर्यावरण विषयक काम करणाऱ्या सुमारे 15 संस्था असून त्यांचे दीड हजार स्वयंसेवक आहेत. ज्या ठिकाणी झाडे पडली आहेत. त्या ठिकाणी जाऊन पर्यावरण प्रेमी देशी झाडांचे बियांच्या माध्यमातून रोपण करणार आहे. आजपासून या मोहिमेला सुरवात केली आहे. प्रत्येक कार्यकर्ता वेळ मिळेल तसे हे काम करणार आहे.”
राहुल घोलप, स्वयंसेवक-निसर्गराजा मित्र जिवांचे