शिल्पा रसाळ
नगर – पर्यावरण पूरक बांबूचे घर…. वाचायला वेगळ वाटतय ना..? पण नगर शहरात सतीश गुगळे यांनी गेल्या 11 वर्षांपूर्वी बांबूचा वापर करून घर बांधले आणि ते आजही भरभक्कम पणे उभे आहे. देशाच्या बांधकाम क्षेत्रात नगरने पर्यावरण पूरक बांबूचे घर उभारून आपला वेगळा ठसा उमटवत क्रांती घडवून आणली आहे.
घराचे बांधकाम आरसीसी पद्धतीने केले असून यात लोखंडऐवजी बांबू चा वापर केला. बावीसशे स्क्वेअर फुटाच्या दूमजली घरात सज्जा, बिम, कॉलम, स्लॅब, आतील जिना, लाफ्ट यासाठी बांबू चा वापर केला. गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक आणि पणे येथील प्रयोगशाळेत बांबूच्या विविध चाचण्या करण्यात आल्या. वाळू ऐवजी चुना, खडी, डस्ट चा वापर करुन या घराची उभारणी केली गेली. घराच्या आतील तापमानात बाहेरील तापमानापेक्षा सहा ते सात अंशाचा फरक जाणवतो.
गच्चीवरील जाळीदार पॅरामिट वॉल मुळे घरातील हवा खेळती राहते. गोपीराज नायडू यांनी या बांबूच्या घराची उभारणी केली. स्थापत्य अभियंता आशिष मुथीयान, आर्किटेक कन्हैया गांधी, संगमनेर येथील स्ट्रक्चरल डिझायनर मधुकर वाकचौरे या सर्वांच्या अथक प्रयत्नांनी दुमजली बांबूचे घर आकाराला आले. शहरातील बुरुडगाव रोडवरील फुलसौंदर मळ्यात दुमजली बांबूचे घर उभे आहे.
बांबूच्या वापराने लोखंडाच्या खर्चात 80 टक्के बचत झाली. 12 वर्षांपूर्वी लोखंडाची किंमत 4 लाख रुपये होती. पण केवळ साडेचारशे ते पाचशे बांबूचे नग वापरून म्हणजे फक्त 48 हजार रुपये खर्च या घरासाठी आला. बांबूच्या वापरामुळे या घराचे आयुष्य 200 वर्षांपेक्षा ही अधिक आहे. श्रीगोंदा तालुक्यातील आढळगावात गुगळे यांचे बंधू निलेश गुगळे यांनीही बांबूचे घर बांधले.