पुणे -शालेय शिक्षण विभागातील कामकाजाची घडी बसविण्यासाठी शिक्षण विभागातील संचालक, सहसंचालक, विभागीय मंडळाच्या अध्यक्ष पदांवर चक्क महसूल आणि ग्रामविकास विभागसह अन्य विभागातील अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. शिक्षण विभागाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारे महसूल आणि ग्रामविकास खात्यातील अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्ती चर्चेचा विषय झाला आहे.
बोगस शिक्षक भरती, टीईटी घोटाळा, बोगस टायपिंग प्रमाणपत्र, सीबीएसई शाळांच्या बोगस “एनओसी’, वाढती लाचखोरी, अधिकाऱ्यांवर पोलिसांकडे दाखल होत असलेले गुन्ह्यांची प्रकरणे यामुळे शिक्षण विभागाची प्रतिमा कलंकीत झाली होती. शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी शिक्षण विभागाला शिस्त लावण्यासाठी धडाकेबाज सुरुवात केली. मात्र त्यांना उपलब्ध असलेल्या अधिकाऱ्यांकडून सक्षमपणे फारशी साथ कधी मिळालीच नाही. संचालक, सहसंचालक, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष यासारखी पदे रिक्त राहिली होती. या पदांचा अतिरिक्त भार उपलब्ध असलेल्या अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला होता. मात्र मूळ विभाग व अतिरिक्त कार्यभाराचा विभाग अशा दोन्ही विभागांचे कामकाज करताना अधिकाऱ्यांचीच डोकेदुखी वाढली होती. यावर मार्ग काढण्यासाठी शिक्षण विभागातील रिक्त पदांवर मंत्रालयील विभागातील सहसचिव, उपसचिव व महसूल संवर्गातील अधिकाऱ्यांची पदे प्रतिनियुक्तीने भरण्याचा निर्णय फेब्रुवारी 2023 मध्ये घेण्यात आला होता. त्यानुसार 19 रिक्त जागांसाठी इच्छुक अधिकाऱ्यांकडून अर्जही मागविण्यात आले होते. यातून महसूलच्या 5, ग्रामविकासमधील 3, मंत्रालयीन आस्थापनेवरील 2, राज्य नियोजन मंडळातील 1 याप्रमाणे अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्ती झाली आहे.
या अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्ती
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक पदी सामान्य प्रशासन विभागातील सहसचिव सं. द. सुर्यवंशी यांची तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अध्यक्षपदी अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार बेडसे यांची तीन वर्षासाठी प्रतिनियुक्तीने वर्णी लागली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयुक्त पदी भंडारा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, शिक्षण आयुक्तालयातील सहसंचालकपदी अप्पर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, प्राथमिक शिक्षण संचालनालयातील सहसंचालकपदी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील सहाय्यक आयुक्त संतोष हराळे, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयातील सहसंचालकपदी गडचिरोली जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रशांत शिर्के, पुणे बोर्डाच्या अध्यक्षपदी अप्पर जिल्हाधिकारी मंजूषा मिसकर, नाशिक बोर्डाच्या अध्यक्षपदी राज्य नियोजन मंडळाचे विशेष कार्य अधिकारी विजय पोवार, कोल्हापूर बोर्डाच्या अध्यक्षपदी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. उदय पाटील, अमरावती बोर्डाच्या अध्यक्षपदी अप्पर जिल्हाधिकारी सूरज वाघमारे, आदिवासी विकास आयुक्तालयातील सहआयुक्त पदी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागातील उपसचिव डॉ. श्रीनिवास कोतवाल आदी अधिकाऱ्यांची एका वर्षासाठी प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे.