पिंपरी – युवकांमध्ये लोकप्रिय व शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात दांडगा जनसंपर्क असलेले सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक गणेश गायकवाड यांनी आपल्या समर्थकांसह कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रवेशावेळी कॉंग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे व नानासाहेब गायकवाड उपस्थित होते.
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर कॉंग्रेसमध्येही आता इनकमिंग सुरू झाले आहे. पटोले यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवत कॉंग्रेसमध्ये आपण प्रवेश केल्याचे गायकवाड यावेळी म्हणाले. तर गायकवाड यांच्या प्रवेशाप्रसंगी बोलताना पटोले म्हणाले, “गायकवाड यांच्या प्रवेशाने शिवाजीनगर विधानसभा मतदार संघ आणि पिंपरी-चिंचवडमध्ये कॉंग्रेसला मोठे बळ मिळेल. तसेच, तरुणांमधील गायकवाड यांच्या संपर्काचा कॉंगेसच्या वाढीसाठी उपयोग होणार आहे. बाधंकाम आणि उद्योग क्षेत्रातील गायकवाड यांच्या प्रतिमेचा देखील कॉंग्रेस पक्षाला उपयोग होणार असून त्यांच्यावर प्रदेश पातळीवरील मोठी जबाबदारी दिली जाईल.’
चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप हे गायकवाड यांचे जवळचे नातेवाईक आहेत. गतवेळी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी गायकवाड प्रयत्नशील होते. गायकवाड यांच्या कॉंग्रेस प्रवेशाने भाजपला धक्का बसल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. तसेच, राष्ट्रवादी कॉंग्रेस ही गायकवाड यांना पक्षात घेण्यासाठी प्रयत्नशील होती. मात्र, त्यांच्या कॉंग्रेस प्रवेशाने राष्ट्रवादीलाही धक्का बसल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.