मेघश्री दळवी
पृथ्वीवरच्या कचऱ्याची समस्या कमी की काय म्हणून आता अवकाशातल्या कचऱ्याची समस्या वाढत जाताना दिसत आहे. अंतराळ युगाची नांदी सुरू झाल्यापासून गेली सुमारे साठ वर्षे अनेक मोहिमा अवकाशात गेल्या आहेत. सोबत कृत्रिम उपग्रहांची संख्या वाढत चालली आहे. स्टारलिंकसारख्या प्रकल्पांनी तर ही संख्या अनेक पटींनी वाढली आहे.
अवकाशयानं, प्रोब्ज, कृत्रिम उपग्रह, हे सारे व्यवस्थित काम करत असतात तोवर आपल्या लक्षात येत नाही. पण ही यानं बिघडली किंवा त्यांचं काम संपून त्या नुसत्या घिरट्या घालत राहिली की त्यांच्यामागचे धोके लक्षात येतात. यानांचे काही भाग, बिघडलेल्या उपकरणांचे घटक, एखादा निखळलेला तुकडा हे सगळं अवकाशातच वेगाने फिरत असतात. त्यामुळे नवी यानं किंवा नवा उपग्रह यांच्यावर ते कधीही आदळू शकतात. कधी पृथ्वीवरही कोसळू शकतात. प्रचंड वेगामुळे एखादा बटनाएवढा तुकडादेखील यानांसाठी अतिशय घातक ठरू शकतो. आंतरराष्ट्रीय अवकाशस्थानकाला वर्षातून निदान एकदा तरी आपली कक्षा किंचित बदलून या कचऱ्यापासून बचाव करावा लागतो. एखादंवेळी असा बदल करणं जमलं नाही तर काय होईल, या कल्पनेनेच थरकाप उडतो.
अवकाश कचऱ्याचा प्रश्न आता दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. एका पाहणीनुसार पृथ्वीभोवती भ्रमण करणाऱ्या लहान-मोठ्या तुकड्यांचं एकूण वजन सुमारे आठ हजार टन भरेल. पण हा कचऱ्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. तो सगळा कचरा वेचून त्याची योग्य ती विल्हेवाट लावणे हाच त्यावरचा उपाय आहे. त्यातले काही भाग परत पृथ्वीवर आणून रिसायकल करून घेता येतील. त्यातून काही मौल्यवान धातू मिळवता येतील. काही घटक संशोधकांच्या हाती सोपवता येतील, तर काही साधनं म्युझियममध्ये जतन करून ठेवता येतील. मात्र, यासाठीचा अवाढव्य खर्च पाहता बराचसा कचरा अंतराळातच नष्ट झालेला उत्तम, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
या हेतूने काही मोहिमा सुरू होत आहेत. एल्सा-डी हा जपानी कृत्रिम उपग्रह खास याच कामासाठी तयार केला आहे. संवेदकांचा वापर करून या उपग्रहाचा सर्व्हिसर भाग शक्य तितक्या कचऱ्याचा शोध घेईल आणि मग मुख्य क्लायंट भागाकडे परत येईल. हे प्रात्यक्षिक पूर्ण झाल्यावर नियोजितपणे एल्सा-डी पृथ्वीच्या दिशेने येईल आणि वातावरणात प्रवेश करताना जाळून खाक होईल अशी या मोहिमेची आखणी केली आहे. ऍस्ट्रोस्केलही या प्रकारचं काम करणारी पहिली खासगी कंपनी. तिचा हा उपग्रह नुकताच मार्च महिन्यात सोयूझ रॉकेटवरून अवकाशात सोडण्यात आला आणि आता पृथ्वीभोवती फिरत आहे. लवकरच तो आपलं काम सुरू करेल. अवकाशात भरारी मारणं हे थरारक असलं तरी त्यामागे कितीतरी बारीकसारीक गोष्टींचा विचार करावा लागतो हे यातून लक्षात येतं. एल्सा-डीच्या यशावर आपल्या पुढच्या मोहिमा अवलंबून आहेत.