दुबई – जॉनी बेअरस्टो व मोईन अली यांनी केलेल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेपूर्वीच्या सराव सामन्यात 20 षटकांत 5 बाद 188 धावा केल्या. या सराव सामन्यात विजय मिळवण्यासाठी भारतासमोर 189 धावा करण्याचे आव्हान आहे.
भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजी करण्याची संधी दिली. कोहलीच्या या निर्णयाचा पुरेपूर लाभ घेत इंग्लंडच्या फलंदाजांनी मोठी धावसंख्या उभारली. त्यांची सुरुवात मात्र अत्यंत खराब झाली होती.
जोस बटलर, जेसन रॉय व डेव्हिड मलान बाद झाले तेव्हा त्यांची अवस्था बिकट बनली होती. मात्र, बेअरस्टो व मोईन अली यांनी आक्रमक फलंदाजी करत संघाचा डाव सावरताना भारतासमोर आव्हान राहील अशी धावसंख्या उभारून दिली. बेअरस्टो आपले अर्धशतक पूर्ण करू शकला नाही. त्याने आपल्या 49 धावांच्या खेळीत 36 चेंडूत 4 चौकार व 1 षटकार फटकावला.
लियाम लिव्हिंगस्टोननेही 30 धावांची उपयुक्त खेळी केली. मात्र, त्यानंतर मोईन अलीने भारतीय गोलंदाजांवर हल्ला चढवताना नाबाद 43 धावांची खेळी केली. त्यात त्याने 20 चेंडूंचा सामना करताना 4 चौकार व 2 षटकारांची आतषबाजी केली.
संक्षिप्त धावफलक – इंग्लंड – 20 षटकांत 5 बाद 188 धावा. (जॉनी बेअरस्टो 49, लियाम लिव्हिंगस्टोन 30, मोईन अली नाबाद 43, महंमद शमी 3-40, जसप्रीत बुमराह 1-26, राहुल चहर 1-43).