नवी दिल्ली – जागतिक बाजारातील संकेतानुसार दिल्ली सराफात सोमवारी सोन्याच्या दरात केवळ 37 रुपयांची वाढ होऊन सोन्याचा दर 46,306 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.
तयार चांदीचा दर मात्र 323 रुपयांनी वाढून 62,228 रुपये प्रति किलो झाला.
या घटनाक्रमाबाबत बोलताना एचडीएफसी सिक्युरिटी चे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, जागतिक पातळीवर महागाई वाढण्याची शक्यता असल्यामुळे काही गुंतवणूकदार सोने खरेदी करीत असल्यामुळे गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात माफक प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
जागतिक बाजारात सोन्याचा दर 1,766 डॉलर व चांदीचा दर 23.36 डॉलर प्रति औंस या पातळीवर चालू आहे. भारतामध्ये सध्या उत्सवाचा काळ आहे. या काळात सोने खरेदी करण्याची प्रथा आहे. त्यामुळे सध्याच्या तुलनेने कमी दरावर भारतामध्ये आगामी काळात सोन्याची खरेदी वाढण्याची शक्यता विश्लेषकांना वाटते.