गॅले – जॉनी बेयरस्टो आणि डॅन लॉरेंस यांनी केलेल्या नाबाद 62 धावांच्या मदतीने इंग्लंडने पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेवर 7 विकेटस्नी विजय मिळविला आहे. इंग्लंडला अखेरच्या दिवशी विजयासाठी नाममात्र 36 धावांची आवश्यकता होती.
श्रीलंकेने दिलेल्या 74 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने रविवारी 14 धावांत 3 गडी गमविले होते. यानंतर आज खेळ सुरू करताना बेयरस्टो आणि लॉरेंस यांनी सावध खेळी करत विजयावर शिक्कामोर्तब केला. बेयरस्टोने 65 चेंडूत नाबाद 35 धावांची खेळी केली. तर लॉरेंसने नाबाद 21 धावा केल्या. दिलरुवन परेराच्या गोलंदाजीवर बेयरस्टो पायचित झाला होता. मात्र, कर्णधार दिनेश चंडीमल यांने रिव्यू न घेतल्याने त्याला जीवदान मिळाले.
तत्पूर्वी श्रीलंकेचा पहिला डाव 135 धावांत गुंडाळला होता. त्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात 421 धावा करत मोठी आघाडी घेतली होती. प्रत्युत्तरात श्रीलंकेने दुसऱ्या डावात 359 धावा केल्या होत्या.
दरम्यान, इंग्लंडने श्रीलंकेविरूद्ध सलग पाचवा कसोटी सामना जिंकला आहे.
कोणत्याही आशियाई संघाने आशियामध्ये सलग 6 कसोटी सामने जिंकलेला नाही. यापूर्वी ऑस्ट्रेलियाने सलग पाच कसोटी सामने जिंकले आहेत. आता इंग्लंडने गॅलेमधील दुसऱ्या कसोटीतही श्रीलंकेला हरविल्यास ऑस्ट्रेलियाचा विक्रम मोडित निघेल.