कांगारुंच्या देशात : …नाही अनुभव तरीही

-अमित डोंगरे

ब्रिस्बेनचा चौथा कसोटी सामना आता रंगतदार अवस्थेत आला आहे. यजमान ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 10 गडी, तर भारतीय संघाला आणखी 324 धावांची गरज आहे. मात्र, या सामन्यात विजय किंवा पराभव होईल ही शक्‍यता दोन्ही संघासमोर आहे. पण सामन्याचे महत्त्व म्हणाल तर, ती आहे भारतीय गोलंदाजी.

हा सामना सुरू होण्यापूर्वी या गोलंदाजीचे समीक्षण काही जाणकारांनी अत्यंत कमकुवत आणी अननुभवी असल्याचे केले. मात्र, तरीही आज याच अननुभवी गोलंदाजीने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीला उद्‌ध्वस्त केले, सुरूंग लावला किंवा आणखी काही विशेषणे असतील तर तीदेखील चपखल बसतील. भारतीय गोलंदाजीचा अनुभव पाहिला तर या सामन्यातील ऑस्ट्रेलियाच्या धावफलकावर कोणी विश्‍वासही ठेवणार नाही.

नवदीप सैनी व शार्दुल ठाकूर यांची ही दुसरी कसोटी, टी. नटराजन व वॉशिंग्टन सुंदर यांची ही पदार्पणाची म्हणजेच पहिलीच कसोटी. त्यात महंमद सिराज हाच केवळ थोडा जास्त अनुभवी. म्हणजे त्याची ही तिसरी कसोटी. पण कामगिरी पाहिली तर ऑस्ट्रेलियाची जागतिक दर्जाची सर्वात बलाढ्य फलंदाजी पाहता पाहता नेस्तनाबूत केल्याने त्यांना “अनुभवी’ असेच म्हणावेसे वाटते. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 369, तर दुसरा डाव 294 धावावंर उखडून टाकला.

आपल्याला पहिल्या डावात थोडी पिछाडी पत्करावी लागली असली तरीही ते फलंदाजांचे अपयश आहे, गोलंदाजांचे नव्हे. स्थिरावल्यावरही आपली विकेट इतकी स्वस्तात गमावली हे पाहता आपल्या फलंदाजांना विकेटचे काही गांभीर्यही नसल्याचे दिसून आले. गोलंदाजांनी मात्र या कसोटीत अफलातून कामगिरी केली. या डावात सिराजने कसोटी कारकिर्दीत पहिल्यांदाच 5 गडी बाद केले. त्याला सुरेख साथ देताना शार्दुल ठाकूरने 4 गडी बाद केले. आता कोणी म्हणेल का त्यांच्याकडे अनुभव नाही म्हणून. सिराज आणि कंपनीपुढे स्टिव्ह स्मिथ वगळता एकाही फलंदाजाला अर्धशतकही फटकावता आले नाही. यातच आपल्या गोलंदाजांकडे गुणवत्ता आहे, हेच सिद्ध होत आहे.

त्यातही स्मिथला एकदा जीवदान मिळाले नसते तर संपूर्ण डावात एकालाही अर्धशतकी खेळी करता आली नसती. सिराजचे नामकरण आता सरताज करायला हरकत नाही. पदार्पणातील कसोटी मालिका खेळताना त्याची मनस्थिती देखील ठीक नव्हती. त्याच्या वडिलांचे निधन झाले होते तरीही त्याला मायदेशी येता आले नाही. तसेच मेलबर्न, सिडनी कसोटीपाठोपाठ ब्रिस्बेन कसोटीतही सिराजला वर्णद्वेषी टिकेचा आणि स्लेजिंगचाही सामना करावा लागला. पण त्याने या टीकाकारांचे गाल आपल्या कामगिरीने लाल केले.

त्याने केवळ 19.5 षटके गोलंदाजी करताना 5 षटके निर्धाव टाकत 73 धावांच्या मोबदल्यात 5 गडी बाद केले. याच सिराजने आपल्या खिलाडूवृत्तीचे दाखले प्रत्येक सामन्यात दिले तरीही त्याच्या वाट्याला ताशेरे आणि टोमणेच आले होते.

दुसरीकडे ठाकूरनेही आपल्या गुणवत्तेची साक्ष दिली. त्याने 19 षटके टाकताना 2 निर्धाव षटके टाकली व 61 धावांत 4 गडी बाद केले. पदार्पण केलेल्या टी. नटराजनला या डावात बळी जरी मिळाले नसले तरीही त्याने धावांवर लगाम लावण्याची मोलाची कामगिरी केली. तसेच वॉशिंग्टन सुंदरनेही 1 गडी बाद केला. त्याची गोलंदाजी व फलंदाजी ही भारतीय संघासाठी बोनस नव्हे तर ट्रम्पकार्ड ठरली यात शंका नाही.

असो, आता हा सामना रंगतदार अवस्थेत आला असून भारताने सामना अनिर्णित राखला तरीही बॉर्डर-गावसकर करंडक आपल्याकडेच राहील. हा दौरा या सामन्यानंतर संपेल व भारतीय संघ अनुभवाची नव्हे, तर वर्चस्वाची शिदोरी घेऊन मायदेशी परतेल. जसप्रीत बुमराह, महंमद शमी, भुवनेश्‍वर कुमार व ईशांत शर्मा हे प्रमुख गोलंदाज जरी तंदुरूस्ती होऊन संघात परतले तरीही या नव्या गोलंदाजांनाही रोटेशेन पद्धतीने संधी दिली गेली पाहिजे तरच येणारे दशक भारतीय फलंदाजांसह गोलंदाजही गाजवतील. पुढील काळात याच अननुभवी गोलंदाजांच्या आश्‍वासक कामगिरीच्या जोरावर भारतीय संघ जागतिक क्रिकेट पादाक्रांत करेल, असा विश्‍वास वाटतो.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.