खालापूर, (वार्ताहर) – बुलडाणा जिल्ह्यातील अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांची वार्षिक सहल रायगडकडे निघाली असताना मुंबई पुणे एक्स्प्रेस वेरून खोपोलीकडे एक्झिट घेवून शिळफाटाकडे उतरत असताना मिळगाव जवळ तीव्र उतारावर ब्रेक फेल झाला. रस्त्याच्या बाजूला 100 मीटर खाली जाऊन समोरील मोठ्या दगडाला धडक दिल्याने भीषण अपघात झाला.
या अपघातात केबिनमध्ये अडकून जेवण बनवणारा राहुल साहेबराव सुरूशे याचा मृत्यू झाला. बस चालकाच्या प्रसंगसावधतेमुळे बस दगडात आडकल्याने सुदैवाने 45 विद्यार्थी आणि शिक्षक बचावले आहे. ही घटना बुधवारी (दि. २०) घडली.
मिळालेल्या माहितीनुसार अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेज, खामगाव (जि. बुलडाणा) यांची वार्षिक सहल खासगी बस चिखली ते रायगडकडे निघाली होती. मुंबई पुणे एक्स्प्रेस वेमार्गे खोपोली बाह्यवळण घेत शिळफाटाकडे जात असताना ती मिळगाव जवळील तीव्र उतारावर आली असता बसचा ब्रेक फेल झाला. बसने रस्त्याच्या बाजूला 100 मीटर खाली जाऊन समोरील मोठ्या दगडाला धडक दिल्याने भीषण अपघात झाला.
बुधवारी (दि. 20) सकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान हा अपघात घडला. अपघातात बस चालकाच्या केबिनचा चक्काचूर झाला. केबिनमध्ये अडकून जेवण बनवणारा राहुल साहेबराव सूरूशे (वय 30, रा. कोल्हारा चिखली, जिल्हा, बुलडाणा) याचा बसच्या केबिन मध्ये अडकून त्याचा मृत्यू झाला. बसमधील 45 विद्यार्थांना कुठल्याही प्रकारची दुखापत झाली नाही.
अपघाताची माहिती मिळताच खोपोली पोलीस, बोरघाट पोलीस आणि अपघात ग्रस्तटीमचे सदस्य तत्काळ घटनास्थळी दाखल होत बसमधील विद्यार्थी आणि शिक्षकांना तात्काळ बाहेर काढून त्यांना गगनगिरी आश्रम मठ खोपोली येथे त्यांची राहण्याची सोय केली.