चिंचवड, (वार्ताहर) – क्वॉलिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया, पुणे शाखेच्या वतीने औद्योगिक सुरक्षा स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धा भोसरी येथील क्वॉलिटी सर्कल एक्सलन्स सेंटर येथे आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेत विविध औद्योगिक भागांतील सुमारे 35 कंपन्यांतील 501 स्पर्धकांनी सहभाग घेतला.
स्पर्धेचे उद्घाटन एस. के. एफ. कंपनीचे सेफ्टीहेड राहुल बोकील, गौरव शर्मा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. फोरमच्या पुणे शाखेच्या अध्यक्षा डॉ. रजनी इंदुलकर व इतर सदस्य डॉ. अजय फुलंबरकर, माधव बोरवणकर, अनंत क्षीरसागर या वेळी उपस्थित होते. या स्पर्धेत 61 केस स्टडीज, 25 स्किट, 90 पोस्टर्स, 60 स्लोगन यांचा समावेश होता. एकूण 236 जणांना नामांकन प्राप्त झाले.
स्पर्धेच्या समारोप सत्रात प्रमुख पाहुणे विजय हिरेमठ, सतीश काळोखे, डॉ. रजनी इंदुलकर, माधव बोरवणकर, संजीव शिंदे, डॉ. अजय फुलंबरकर, भूपेश मॉल व परिक्षकांच्या हस्ते विजेत्यांना सुवर्ण, रजत व कांस्यपदक प्रदान केले. कार्यक्रमाचे आयोजन प्रशांत बोराटे व चंद्रशेखर रुमाले यांनी तर सूत्रसंचालन विजया रुमाले यांनी केले.