मुंबई – अंमलबजावणी संचालनालयाने अर्थात ईडीने मुंबईमध्ये मोठी कारवाई केली आहे. एका कथित बॅंक कर्ज फसवणूक प्रकरणी केलेल्या कारवाईत ईडीला तब्बल 47 कोटींहून अधिक घबाड सापडले आहे. (Enforcement Directorate seizes 431 kg Gold & Silver from company accused of loan fraud) मनी लॉंडरिंग प्रकरणात पारेख एल्युमिनेक्स लिमिटेड कंपनीच्या विरोधात चौकशी करताना सुमारे 91.5 किलो सोने आणि 340 किलो चांदी जप्त करण्यात आली आहे.
ईडीला शोध कारवाईदरम्यान मेसर्स रक्षा बुलियनच्या आवारात खासगी लॉकरच्या चाव्या सापडल्या. या लॉकरची झडती घेतली असता योग्य नियम न पाळता लॉकर चालवले जात असल्याचे निदर्शनास आले. कोणतेही केवायसी न पाळता तसेच लॉकरच्या आवारात सीसीटीव्ही आणि रजिस्टर नसल्याचे तपासात आढळून आले आहे.
ईडीने लॉकरची झडती घेतली असता 761 लॉकर्स आढळून आले. यातील 3 लॉकर्स मेसर्स रक्षा बुलियनचे होते. लॉकर्स चालवताना 2 लॉकरमध्ये 91.5 किलो सोने आणि 152 किलो चांदी सापडली. याशिवाय मेसर्स रक्षा बुलियनच्या आवारातून अतिरिक्त 188 किलो चांदीही सापडली आहे. हे सर्व सोने-चांदी ईडीने जप्त केले आहे. जप्त केलेल्या वस्तूंची एकूण अंदाजे किंमत 47.76 कोटी एवढी आहे.
इडीने मेसर्स रक्षा बुलियन आणि मेसर्स क्लासिक मार्बल्सच्या 4 परिसरांमध्ये शोधमोहीम पूर्ण केली. मेसर्स पारेख एल्युमिनेक्स लिमिटेडच्या प्रकरणातील मनी लॉंडरिंग चौकशीच्या संदर्भात शोध घेण्यात आला. त्याआधी ईडीने 8 मार्च 2018 रोजी पीएमएलए 2002 च्या तरतुदींनुसार मेसर्स पारेख एल्युमिनेक्स लिमिटेडविरुद्ध मनी लॉंडरिंग प्रकरणाची नोंद केली होती. या कंपनीवर बॅंकांना फसवून 2,296.58 कोटी रुपयांचं कर्ज घेतल्याचा आरोप आहे.
दरम्यान, पारेख एल्युमिनेक्स लिमिटेड विरुद्ध मार्च 2018 मध्ये 2 हजार 296 कोटी रुपयांचे कर्ज घेऊन बॅंकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 2019 मध्ये केलेल्या कारवाईत 205 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता जप्त केली होती.