राज्यातील रिक्षाचालकांचा नियोजित संप मागे

मुंबई – राज्यभरातील रिक्षाचालकांनी भाडेवाढ आणि ओला, उबेरच्या वाहतुकीवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी पुुकारलेला नियोजित संप आज रात्री मागे घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहनमंत्र्यांनी भेटीचे आश्‍वासन दिल्यामुळे आपण हा संप मागे घेत असल्याची घोषणा ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष शशांक राव यांनी केली.

या भेटीत आपल्याला न्याय मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्‍त केली आहे. त्यामुळे जनतेची होणारी गैरसोय टाळण्यासाठी आम्ही संप मागे घेत असल्याचेही शशांक राव यांनी सांगितले.

तत्पूर्वी सोमवारी दुपारी परिवहन सचिवांनी तोडगा काढण्यासाठी मंत्रालयात रिक्षा चालक – मालक संघटनांची बैठक बोलवली होती. मात्र, या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्यामुळे रिक्षा चालक मालक संपावर ठाम होते.

भाडेवाढ, ओला, उबेरसह अवैध वाहतुकीवर बंदी आणि रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याच्या मागणीसाठी हा संप पुकारण्यात आला होता. जवळपास 20 लाख रिक्षाचालक या संपात सहभागी होण्याची शक्‍यता होती.

Leave A Reply

Your email address will not be published.