Share Market Today : भारतीय शेअर बाजाराने नवीन व्यावसायिक वर्षाची चांगली सुरुवात केली आहे. एप्रिलच्या पहिल्या दिवशी देशांतर्गत शेअर बाजार तेजीसह बंद करण्यात यशस्वी झाला. सेन्सेक्स आणि निफ्टी वाढीसह बंद झाले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये आज चांगली खरेदी दिसून आली. क्षेत्रीय आघाडीवर नजर टाकल्यास, रियल्टी, मेटल, पीएसई निर्देशांक वाढीसह बंद झाले. एनर्जी, फार्मा आणि इन्फ्रा शेअर्समध्येही खरेदी दिसून आली.
बँकिंग आणि आयटी निर्देशांक वाढीसह बंद झाले. ऑटो आणि एफएमसीजी शेअर्समध्ये दबाव होता. बाजार हिरव्या रंगात बंद झाला.
मिडकॅप समभागांनीही नवीन व्यावसायिक वर्षाची सुरुवात वाढीसह केली आहे. निफ्टीचा मिडकॅप निर्देशांक सुमारे 2% च्या वाढीसह बंद झाला. इंट्राडे मध्ये, निफ्टी 22,530 ची पातळी गाठण्यात यशस्वी झाला आणि सेन्सेक्स 74,255 च्या नवीन शिखरावर पोहोचला. तथापि, मिडकॅप आणि बँक निर्देशांक अजूनही विक्रमी उच्चांकापासून सुमारे 1,000 अंक दूर आहेत.
आज कोणत्या पातळीवर बंद झाला बाजार ?
सोमवारी दिवसभराच्या व्यवहारानंतर सेन्सेक्स 363 अंकांच्या वाढीसह 74,014 च्या पातळीवर आणि निफ्टी 135 अंकांच्या वाढीसह 22,462 च्या पातळीवर बंद झाला. निफ्टी बँक निर्देशांक 454 अंकांच्या वाढीसह 47,578 वर बंद झाला. निफ्टीचा मिडकॅप निर्देशांक 836 अंकांच्या वाढीसह 48,912 वर बंद झाला.
या शेअर्समध्ये वाढ –
चीनमधील मॅन्युफॅक्चरिंगची आकडेवारी 13 महिन्यांतील सर्वात मजबूत राहिल्यानंतर आज धातूचे शेअर्स वाढताना दिसले. निफ्टी मेटल इंडेक्स आज 4% वाढीसह बंद झाला. मार्चमध्ये ऑटो कंपन्यांच्या मिश्र विक्रीच्या आकडेवारीनंतर आयशर मोटर्स (Eicher Motors) शेअर 2% घसरणीसह बंद झाला. सोन्याच्या किमतीतील विक्रमी वाढीमुळे, मुथूट फायनान्स (Muthoot Finance) आणि मनपुरम फायनान्स (Manppuram Finance) सारख्या समभागांमध्ये आज 5% वाढ झाली.
मालमत्तेत 6 लाख कोटी रुपयांनी वाढ –
नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या ट्रेडिंग सत्रात शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. बीएसईवर सूचीबद्ध समभागांचे बाजार भांडवल 393.35 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे गेल्या ट्रेडिंग सत्रात 386.91 लाख कोटी रुपये होते. आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 6.44 लाख कोटी रुपयांची वाढ झाली.
सेन्सेक्समधील 30 शेअर्सची स्थिती पहा –