गावावर शोककळा; पाय घसरून पडल्याने दुर्घटना
पळशी – मनकर्णवाडी, ता. माण येथील साक्षी संतोष जगदाळे (वय 11) ही मंगळवारी (दि. 1) सायंकाळी सहाच्या सुमारास लोधवडे-मनकर्णवाडी ओढ्यावरील बंधाऱ्यात पाय घसरून पडल्याने तिचा मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.
याबाबत माहिती अशी, साक्षी जगदाळे ही मंगळवारी सायंकाळी 6 च्या सुमारास लोधवडे-मनकर्णवाडी ओढ्यावरील चिंचेचा बंधाऱ्याच्या भिंतीवरून ओढ्याच्या पलीकडे जाताना पाय घसरून ती पाण्यात पडली. तिच्या सोबत असलेल्या मैत्रीणीने आरडाओरडा केल्यानंतर ग्रामस्थांनी तिकडे धाव घेतली. गावातील तरुणांनी मंगळवारी रात्री 11 वाजेपर्यंत तिचा शोध घेतला. मात्र, अंधारामुळे
शोध घेण्यात अडचणी आल्याने मोहीम थांबवण्यात आली.
तरुणांनी बुधवारी सकाळी पुन्हा शोध घेतल्यानंतर 7 वाजता साक्षीचा मृतदेह सापडला. साक्षी ही पळशी येथील श्री हनुमान विद्यालयात इयत्ता पाचवीत शिकत होती. तिचे वडील मुंबई येथे चालक असून ती आई व आजीसोबत गावात राहत होती. अत्यंत हुशार व होतकरू असलेल्याने साक्षीच्या दुर्दैवी मृत्यूने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्घटनेबद्दल मनकर्णवाडी व पळशी गावात हळहळ व्यक्त होत आहे.
प्रशासनाकडून दुर्लक्ष
ही घटना घडल्यानंतर ग्रामस्थांनी पोलीस व प्रशासनाला माहिती दिली तरी घटनास्थळी कोणीही आले नाही. मात्र, तहसीलदार माने यांना फोन करताच त्यांनी या दुर्घटनेची तात्काळ दखल घेतली. त्यांनी कराडहून बोट मागवली होती; परंतु तोपर्यंत गावातील तरुणांनी साक्षीचा मृतदेह शोधून काढला होता.