सुमारे तीन दशकांचे सदस्यत्व शुक्रवारी झाले समाप्त
नवी दिल्ली – माजी पंतप्रधान व विश्वविख्यात अर्थशास्त्रज्ञ डॉ. मनमोहनसिंग यांची राज्यसभा सदस्यत्वाची मुदत काल शुक्रवारी संपली. 1991 साली राज्यसभेचे सदस्य झालेले डॉ मनमोहनसिंग हे आत्ता पर्यंतच्या अवधीत दहा वर्ष पंतप्रधान या नात्याने राज्यसभेचे नेते होते व सहा वर्ष त्यांनी येथे विरोधी पक्षनेते म्हणूनही काम पाहिले आहे.
ते आसामातून राज्यसभेवर निवडून गेले होते. पण त्या विधानसभेत कॉंग्रेसकडे पुरेसे संख्या बळ नसल्याने त्यांना तेथून पुन्हा राज्यसभेत पाठवणे पक्षाला शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांच्या संसदीय कारकिर्दीला आता विराम दिला गेला आहे. आसामात कॉंग्रेसला आपला प्रतिनिधी राज्यसभेत पाठवायचा तर त्यांना तेथे किमान 43 आमदारांचे संख्याबळ असणे आवश्यक आहे. पण कॉंग्रेसकडे तिकडे केवळ 25 आमदारच आहेत.
पंजाब, राजस्थान, मध्यप्रदेश, कर्नाटक अशा राज्यांतून मनमोहनसिंग यांना राज्यसभेत पाठवणे कॉंग्रेसला शक्य आहे पण त्या राज्यांमध्ये राज्यसभेची जागाच रिकामी नसल्याने मनमोहनसिंग यांच्या संसदीय कारकिर्दीला सध्या तरी ब्रेक लागला आहे. संसदेच्या अधिवेशनात आता ते उपस्थित राहु शकणार नाहींत. सन 2008 साली आलेली जागतिक मंदी आपल्या अर्थशास्त्रीय कौशल्याच्या बळावर रोखून धरणारे राष्ट्रप्रमुख अशी त्यांची जगात ख्याती झाली असून त्यांच्या दहा वर्षाच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत देशाने चमकदार आर्थिक कामगिरी नोंदवली आहे. तसेच या अवधीत देशाने विकासाची नवी उंचीही गाठली होती.