हिरवाई हरवत चालल्याने महापालिकेकडून लिनियर गार्डनचा प्रस्ताव
पिंपरी – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या रेल्वेसाठी आरक्षित असलेल्या आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळील जागेवर राडारोडा टाकलेला आहे. काही ठिकाणी नागरिकांनी मुरूम टाकून सपाटीकरण केले आहे. तर, काही ठिकाणी छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी चक्क अतिक्रमणे केल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.
बीना इंग्लिश मीडियम स्कूलसमोर महापालिका मालकीच्या मैलाशुद्धीकरण केंद्राजवळदेखील राडारोडा टाकलेला आहे. संबंधित जागेवर होत असलेल्या अतिक्रमणांच्या पार्श्वभूमीवर येथील हिरवाई हरवत चालली आहे. त्यामुळे आता महापालिकेकडून येथे लिनियर गार्डन उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे.
आकुर्डी येथील बीना इंग्लिश मीडियम स्कूलपासून पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयापर्यंत रेल्वे लोहमार्गाला आकुर्डी बाजूने असलेल्या जागेची “दै. प्रभात’च्या प्रतिनिधीने मंगळवारी प्रत्यक्ष पाहणी केली. संबंधित जागेत बीना इंग्लिश मीडियम स्कूल ते संजय काळे ग्रेडसेपरेटर या अंतरात काही ठिकाणी सपाटीकरण केल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. काही ठिकाणी बांधकामाचा मुरूम, माती टाकलेली होती. अतिक्रमण करून टाकलेले फर्निचरचे दुकान, छोट्या विक्रेत्यांची दुकाने पाहण्यास मिळाली. तसेच, दोन ते तीन झाडे पूर्णपणे उन्मळून पडल्याचे चित्रही दिसले. संजय काळे ग्रेडसेपरेटरपासून पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय या अंतरात प्रामुख्याने छोट्या व्यावसायिकांनी संबंधित जागेत ठिकठिकाणी टपऱ्या टाकल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. त्याशिवाय, काही ठिकाणी बांधकामांचा राडारोडा टाकला होता. रेल्वे लोहमार्गाला लागून असलेल्या संबंधित जागेत मोठ्या प्रमाणात झाडे होती. जागेचे ठिकठिकाणी केलेले सपाटीकरण, टपऱ्या टाकून झालेले अतिक्रमण यामुळे येथील हिरवाई हरवत चालली आहे.
रेल्वे प्रशासनाच्या होकाराची प्रतीक्षा
आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळ संजय काळे ग्रेडसेपरेटर ते इनरव्हील चौकादरम्यान महापालिकेकडून लिनियर गार्डन विकसित करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. महापालिका बीआरटीएस विभागाकडून याबाबतचे पत्र मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांना नुकतेच देण्यात आले आहे. या प्रस्तावानुसार संबंधित जागेचे सुशोभीकरण केले जाईल. तसेच, तेथे हिरवळ विकसित केली जाणार आहे. एकूण 17 प्रकारच्या सुविधा देण्याचे नियोजन आहे. त्यामध्ये स्क्विरल पार्क, नाना-नानी पार्क, बर्ड पार्क, बोटॅनिकल गार्डन, दुचाकी पार्किंग, आर्ट प्लाझा, फॅशन प्लाझा, हर्बल गार्डन, फ्लोअर गार्डन, चिल्ड्रन प्लाझा, ऍडव्हेंचर पार्क, स्केटिंग रिंग, बास्केटबॉल कोर्ट, झेन गार्डन आदी प्रमुख बाबींचा समावेश आहे. मध्य रेल्वेकडून त्यासाठी परवानगी मिळाल्यानंतर महापालिकेकडून प्रत्यक्ष निविदा काढून कार्यवाहीला सुरवात होईल.
आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळील जागेत होणारी अतिक्रमणे, बांधकामांचा टाकला जाणारा राडारोडा याबाबत पुरेशी माहिती घेतल्यानंतरच त्याबाबत बोलता येईल.
– मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे.
आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या जागेत लिनियर गार्डन उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेने मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांना नुकताच दिलेला आहे. या प्रस्तावानुसार प्रत्यक्ष कार्यवाही सुरू झाल्यानंतर येथे अतिक्रमणे होणार नाहीत. तसेच, संबंधित परिसर स्वच्छ होऊन त्याच्या सौंदर्यात भर पडेल. पर्यायाने, परिसराची हिरवाई देखील टिकून राहील.
– रतन रजक, स्टेशन प्रबंधक, आकुर्डी रेल्वे स्थानक