देहूरोड, ( वार्ताहर) – नवीन प्रतीक्षा दालन, बुकिंग ऑफिस, नवीन सरकत्या पायांचा जिना, प्लॉट सुशोभीकरण, पिण्याचे शुद्ध पाणी, पुरेशा प्रमाणात विद्युत प्रकाश, पंखे, बसायला बाकडे, वाहनतळ, बगीचा, महिला व पुरुषांसाठी स्वच्छतागृह देहूरोड रेल्वे स्टेशन बनविण्यात येणार असून येत्या सहा महिन्यांत हे पूर्ण करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारच्या अमृत भारत रेल्वे स्टेशन पुनर्विकास योजनेअंतर्गत देशातील ५५४ रेल्वे स्टेशन पूर्ण विकास संकल्पाअंतर्गत अद्यावत करून त्यांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्यामध्ये देहूरोड रेल्वे स्टेशनचा समावेश करण्यात आला आहे. या कामाचा प्रारंभ सोमवारी (दि. २६) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन करण्यात आला.
या वेळी नयना सोनवणे, मधुरा पंडित आणि सेंट ज्युड स्कूल, महात्मा गांधी शाळा, शिवाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी देभक्तीपर गीते सादर केली. त्यानंतर चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पुणे मंडल रेल्वेचे डीओएम डॉ. रामदास भिसे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या वेळी खासदार श्रीरंग बारणे, नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ, रघुवीर शेलार,सारिका नाईकनवरे, शिवसेनेचे भरत नायडू, रमेश जाधव, राष्ट्रवादीचे बाळासाहेब जाधव, भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा सारिका मुथ्था, देहूरोड रेल्वे स्टेशनचे व्यवस्थापक राम रजक, ए. के. यादव, देवानी कन्नन, जोसेफ डॅनियल, अशोककुमार पटेल, सुशील मुर्मु, प्रफुल्ल मोर्या, ए. के. कुलकर्णी, पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब लाड आदी उपस्थित होते.
या वेळी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, देशातील तरुण आता मोठी स्वप्ने पाहत आहे. तसेच ती पूर्ण करण्यासाठी दिवस-रात्र काम करत आहे हाच संकल्प रेल्वेच्या कामामधून दिसून येत आहे. देशातील हजारो विद्यार्थ्यांनी विकसित भारताचे स्वप्न पाहिले आहे. त्यांनी आपल्या चित्रकलेच्या माध्यमातून हे स्पष्ट केले आहे. अशा विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन आज सन्मानित करण्यात आले आहे.
अद्यावत रेल्वे स्टेशन
नवीन प्रतीक्षा दालन, बुकिंग ऑफिस, नवीन सरकत्या पायांचा जिना, प्लॉट सुशोभीकरण, पिण्याचे शुद्ध पाणी, पुरेशा प्रमाणात विद्युत प्रकाश, पंखे, बसायला बाकडे, वाहनतळ, बगीचा, महिला व पुरुषांसाठी स्वच्छतागृह देहूरोड रेल्वे स्टेशन बनविण्यात येणार आहे. या शिवाय दक्षिण उत्तर भुयारी मार्ग, उड्डाण पूल भुयारी मार्ग आणि विशेषताः संपूर्ण रेल्वे स्टेशनवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. हे काम येत्या सहा महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे.