आपल्याकडे बॉलीवूडमध्ये ज्याप्रमाणे चोरून चोरून प्रेमप्रकरणे, भेटी-गाठी, डेटिंग चालते तसाच प्रकार पाश्चिमात्य राष्ट्रांतही पाहायला मिळतो. तिथे हॉलीवूडमधील कलाकार आपले प्रेमप्रकरण, डेटस् लपवण्याचा प्रयत्न करत असतात. अशीच लपवालपवी करताना हॉलीवूडचा नायक लियोनार्डो डिकेप्रियो पकडला गेला आहे.
कॅमिला मोरोन या आपल्या 22 वर्षीय गर्लफ्रेंडसोबत लियोनार्डो फिरायला गेला होता. यादरम्यान त्याने लोकांपासून चेहरा लपवण्याचा बराच प्रयत्न केला. कोलारडोमधील ऍस्पेन येथे असणाऱ्या एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना या दोघांना अनेकांनी पाहिले. त्यावेळी लियोनार्डोने बेसबॉल कॅप आणि काळ्या रंगाचे ब्लेझर घातले होते; तर त्याच्या गर्लफ्रेंडनेही बेसबॉल कॅप परिधान केली होती. दोघेही जण लोकांच्या नजरेस पडणार नाही अशा प्रकारे चालले होते. त्याच दिवशी डिकेप्रियो आणि कॅमिला हे हॉलीवूडची नायिका लुकास हाससोबतही शॉपिंग करताना दिसले. त्यांना पाहणाऱ्यांनी लगेचच बातमी लीक केली आणि मग चर्चांना उधाण आले.
लियोनार्डो हा “वन्स अपॉन अ टाईम इन हॉलीवूड’ या चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट साठच्या दशकात अमेरिकेत गाजलेल्या हिप्पो चळवळीवर आधारित आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने डिकेप्रियो हा पहिल्यांदाच क्वेंटीन टेरेटिनो या दिग्दर्शकासोबत काम करत आहे.