नेवासा (प्रतिनिधी) – नेवासा येथील लोकनेते स्व.मारुतरावजी घुले पाटील पतसंस्थेमध्ये एका कर्मचार्यानेच चक्क साडे सतरा लाखांचा अपहार केल्याचे उघडकीस आल्यामुळे नेवासा शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत स्व.मारुतराव घुले पाटील बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे मॅनेजर अंकुश धनक यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. घुले पाटील सहकारी पतसंस्थेमधील कर्मचारी दत्ता नरसू लष्करे हा गेल्या काही दिवसांपासून पतसंस्थेचे दैनिक अल्प बचत खाते व कॅशियरचे कामकाज बघत आहे.
त्याने 1 मे 2021 ते 9 फेब्रुवारी 2022 दरम्यानच्या काळात स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पदाचा गैरवापर करून दैनिक अल्पबचत ठेवीदारांचे 6 लाख 65 हजार 34 रुपये व 10 लाख 85 हजार 818 रूपये असा 17 लाख 50 हजार 852 रुपयांचा अपहार केला आहे.
नेवासा पोलिसांनी दत्ता लष्करे याच्याविरूद्ध फसवणुकीसह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ठेवीदारांचे पैसे जमा करतांना बँक पासबुकही या कर्मचार्याने जवळ ठेवून ठेवीदाराकडून जमा केलेली रक्कम घेऊन त्यांच्या खात्यात जमा केली नसल्यामुळे हा अर्थिक घोटाळा उघड झाला आहे. या घोटाळ्यामुळे खातेदारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.