पुणे – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इंग्रजीतून अध्यापनाचे तंत्र विकसित करण्यासाठी पवित्र पोर्टलद्वारे भरती प्रक्रियेतून निवड होणाऱ्या उमेदवारांची केंद्र स्तरावर साधन व्यक्ती म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. त्यासाठी इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेल्या किंवा व्यावसायिक पात्रता इंग्रजी माध्यमातून घेतलेल्या उमेदवारांची निवड होणार आहे.
इंग्रजी अध्यापनासाठी साधन व्यक्तीची नेमणूक, अर्धवेळ शिक्षकांची निवड, दोन विषयांच्या कार्यभाराबाबत पात्रता निश्चित करणे, अभियोग्यताधारकांच्या निवडीच्या शिफारसीसंदर्भातील निर्णयांचा समावेश आहे. मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू राहण्यासाठी अध्यापनाच्या दर्जात गुणवत्तापूर्ण सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. त्या अनुषंगाने केंद्राअंतर्गत शिक्षकांना इंग्रजी विषयाचे अध्यापन करण्याचे तंत्र विकसित करण्यासाठी केंद्रस्तरावर साधन व्यक्ती म्हणून निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या पदासाठी संपूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालेले उमेदवार, संपूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालेले आणि व्यावसायिक पात्रता कोणत्याही माध्यमातून झालेले उमेदवार, बारावीपर्यंतचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून आणि व्यावसायिक पात्रता कोणत्याही माध्यमातून झालेले उमेदवार, दहावीपर्यंतचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून आणि व्यावसायिक पात्रता कोणत्याही माध्यमातून झालेले उमेदवार, संपूर्ण शिक्षण कोणत्याही माध्यमातून आणि व्यावसायिक पात्रता इंग्रजी माध्यमातून असलेले उमेदवार पात्र ठरणार आहे.
विद्या प्राधिकरणतर्फे प्रशिक्षण…
साधन व्यक्ती म्हणून निवड करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदे (विद्या प्राधिकरण) मार्फत एक परीक्षा घ्यावी लागणार असून आवश्यकतेनुसार प्रशिक्षण आयोजित करावे लागणार आहे. या संदर्भात शिक्षण आयुक्त यांनी आराखडा तयार करून अंमलबजावणी करण्याचे निर्देशही राज्य शासनाकडून देण्यात आले.