पिंपळे गुरव – दापोडी गावचे ग्रामदैवत असलेले फिरंगाई माता मंदिर पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध आहे. या ठिकाणी सगळे सणोत्सव गावकरी आनंदाने साजरे करतात. या मंदिर परिसरात अनेक देवीदेवतांचेही छोट्या मूर्ती आहेत. नवरात्रोत्सवानिमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली आहे.
नवरात्रीनिमित्त फिरंगाई माता मंदिराला मंडप सजावट, विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. या ठिकाणी नवरात्री उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या मंदिराला तीन दरवाजे आहेत. एक मेन दरवाजा दोन्ही बाजूला दोन दरवाजे आहेत. आत गेल्यावर कासवाचे दर्शन केल्यावर समोरच माता फिरंगाईचे दर्शन होते. एका बाजूला प्रथम गणपती दुसऱ्या बाजूलाही शंकराची पिंड, नंदी आहे. आतमध्ये गाभाऱ्यात दगडी कामांमध्ये जुन्या पद्धतीत माता फिरंगाईची मूर्ती रेखीव अशी भक्तांना मनमोहन टाकणारी आहे. या वेळी नवरात्र उत्सवाच्या देवीला विविध रूपात तिची पूजा बांधली जाते. मंगळवार, शुक्रवार पौर्णिमेला भक्तजन देवीला दर्शनासाठी येतात. या वेळी देवीची खना नारळाने ओटी भरली जाते. हळदीकुंकवाचा मान देवीला दिला जातो. भक्तजन भक्तिभावाने देवीचे दर्शन घेण्यासाठी येतात. ही देवी असे सांगितले जाते की पाहुणे म्हणून आलेली देवी आहे. या ठिकाणी पाहुणी झालेली आहे. तिचे मूळ स्थान कुरकुम हे आहे. परंतु ती दापोडीच्या गावकऱ्यांच्या ती गाव माताच झाली.
नवरात्रीमध्ये तर देवीला प्रथम घट स्थापन केली जाते. या घटाला नागिणीच्या पानांची माळ नंतर तिळाच्या पानाची माळ तिळाच्या फुलाच्या पानांची माळ नंतर कडकण्यांची माळ असे अर्पण केले जाते. भक्ती भावाने भक्तजन दर्शनासाठी येतात. कोणी नऊ दिवसाचा उपवास करतात. देवी भरभरून भक्तांना आशीर्वाद देत असते असे देवीची पूजा करणारे सुरेंद्र काटे हे नेहमीच सांगतात. या वेळीे भजनी मंडळाकडून भजन नित्यनियमाने होते.
दापोडीतील माजी नगरसेवक रोहित काटे, स्वाती काटे, राजू बनसोडे व सर्व गावकरी कुटुंब हे गुण्यागोविंदाने देवीचे भक्तिभावाने पूजा करतात. देवीचा गोंधळ केला जातो. गोंधळी परिवाराकडून देवीला संबळावर वाद्य वाजून मान दिला जातो नंतर देवीला भक्तीभावाने नमस्कार केला जातो.