– विनोद मोहिते
इस्लामपूर- दुचाकींची समोरासमोर धडक होवून इस्लामपूर शहरातील उदयन्मुख कबड्डीपटू सिध्दार्थ अरविंद कारंडे (१८ रा. क्रांतिसींह नाना पाटील नगर इस्लामपूर) याचा मृत्यु झाला. गुरुवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास ताकारी रस्त्यावर अपघात झाला. गंभीर जखमी अवस्थेत सिध्दार्थ याला कराड येथे कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेताना त्याचा वाटेत मृत्यू झाला.
याप्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
कबड्डीपटू सिध्दार्थ हा सैनिक भरतीसाठी सराव करत होता. यशोधन नगर मधील यशोधन फाउंडेशनच्या मैदानावर कबड्डीचा सराव करत असे. दररोज यशोधननगर येथील मैदानावर पहाटे सराव करायचा. त्यामुळे तो रात्री तिथेच मुक्कामी असायचा.
गुरुवारी रात्री घरातून जेवण करून मैदानाच्या शेजारी असणाऱ्या मंडळाच्या कार्यलयात झोपायला जात असताना हा अपघात झाला. तत्पूर्वी त्याने निनाई नगर येथील मित्रांशी गप्पा मारल्या होत्या.
तिथून बाहेर पडल्यावर थोड्या अंतरावर ताकारी इस्लामपूर रस्त्यावर दोन-दुचाकींची समोरासमोर अपघात घडला. जोरदार आवाज झाल्याने त्याच्याच मित्रपरिवार रस्त्यावर धावला. तेव्हा सिध्दार्थ रस्त्यावर निपचित पडला होता.
आपल्या मंडळाच्या कबड्डीपटूचा अपघात झाल्याचे कळताच यशोधन फौंडेशनच्या खेळाडूंनी घटनास्थळी गर्दी केली. त्याला जखमी अवस्थेत माजी नगरसेवक व यशोधन फौंडेशनचे संस्थापक शिवाजी पवार यांनी शहरातील खासगी रुग्णालयात नेले असता
त्यांनी कराडला हलवण्याची सूचना केली. मात्र त्याचा वाटेतच वाठार येथे दुर्देवी अंत झाला. तो चार वर्षे कबड्डीचा सराव करीत होता. त्याने अनेक स्पर्धा गाजवल्या होत्या. त्याच्या मृत्युने क्रीडा क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
वाढदिवसाच्या तोंडावर होतकरू खेळाडूचा दुर्दैवी मृत्यू…
सिद्धार्थ एकुलता एक मुलगा होता. येत्या आठवड्यात १४ ऑगस्टला त्याचा वाढदिवस होता. त्याच्या निधनाने त्याचे कुटुंबीय आणि सहकारी खेळाडू सह क्रांतिसिंह नाना पाटील नगर मध्ये शोककळा पसरली. सिद्धार्थचे वडील इलेक्ट्रिकल व्यवसाय सांभाळत आहेत. एकुलत्या एक मुलाला वाढवून सैन्यभरती करण्याचे त्यांचे स्वप्न होते. मात्र दुर्दैवी अपघाताने त्यांचे स्वप्न भंगले.