ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ठाण्यात धोक्याची घंटा वाजली आहे. ठाण्यातील सिनेगॉग चौकात असलेल्या ज्यू धार्मियांचं प्रार्थनास्थळात बॉम्ब ठेवल्याची माहिती ठाणे पोलिसांना देण्यात आली आहे. प्रार्थना स्थळ प्रशासनाला अज्ञात मेलवरद्वारे धमकी देण्यात आली. या ईमेलनंतर एकच खळबळ उडाली आहे. ठाणे पोलिसांकडून याप्रकरणी शोध कार्य सुरू करण्यात आले असून घटनास्थळी पोलिसांचा मोठा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. इतकेच काय तर ठाणे पोलिसांनी येथील रस्ते देखील वाहतुकीसाठी बंद केले आहेत.
ठाण्यातील सिनेगॉग चौक हा वर्दळीचा रस्ता असून ज्यू धार्मियांचं प्रार्थनास्थळात हा मेल आल्यानंतर येथील कर्मचाऱ्याने तात्काळ पोलिसांना माहिती दिली. Funing असे धमकी देणाऱ्या ग्रुपचे नाव असल्याचे म्हंटले जात आहे. सध्या पोलिसांकडून येथे तपास केला जात असून अद्याप येथे संशास्पद असे काही आढळून आलेले नाही. सध्या पोलिसांकडून या ईमेलबाबत अधिक तपास केला जात आहे.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बने उडवून टाकण्याची धमकी
दरम्यान, यापूर्वी देखील बॉम्बने उडवून टाकण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बने उडवून टाकण्याची धमकी नोव्हेंबरमध्ये देण्यात आली होती. धमकी देणाऱ्याने मेल लिहून बिटकॉइन्स देण्याची मागणी केली होती. मुंबई विमानतळावरील सार्वजनिक शांतता भंग करण्याच्या बदल्यात 1 दशलक्ष डॉलर्सची खंडणी मागितली. बिटकॉइनमध्ये एक दशलक्ष डॉलर्सची मागणी केल्याचे पोलिसांनी सांगितले होते. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.