नवी दिल्ली – भारतातील ट्विटरची सेवा अतिशय स्लो (मंद) आहे. ही सेवा वेगवान करण्यासाठी असलेल्या अडचणी दूर करण्यात येणार असल्याचे ट्विटरचे नवे मालक ऍलन मस्क यांनी म्हटले आहे.
भारताबरोबरच इंडोनेशिया आणि इतर अनेक देशात सेवेचा वेग कमी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. गेल्या आठवड्यात एलॉन मस्क यांनी भारतातील जवळजवळ 90% कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. तर उरलेल्या कर्मचाऱ्यांनी आठवड्याला किमान 40 तास काम करावे अशा सूचना दिल्या आहेत. एका ट्विटमध्ये मस्क म्हणतात की भारतातील आणि इंडोनेशियातील ग्राहकांना सेवा स्लो(मंद) गतीने मिळत असल्याबद्दल मी माफी मागतो.
मात्र प्रत्यक्षात भारतातील सेवा स्लो(मंद) नाही असे काही कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. कर्मचाऱ्यांनी मस्क यांच्या वक्तव्यावर टीका केल्यानंतर त्यांना कामावरून जाहीरपणे काढून टाकले जाते. त्यामुळे आता कर्मचारी जास्त बोलण्याचे टाळत असल्याचे वातावरण निर्माण झाले आहे. अमेरिकेत ट्विटर दोन सेकंदाला रिफ्रेश होते. मात्र भारतामध्ये रिफ्रेश होण्यासाठी 10 ते 20 सेकंदाचा कालावधी लागतो तर जगातील काही देशांमध्ये हा कालावधी 30 सेकंदापेक्षा जास्त आहे असे मस्क यांचे म्हणणे आहे.
काही देशात तर अँड्रॉइड फोनवर ट्विटर चालतच नसल्याचा अनुभव असल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भात काही तांत्रिक अडचणी असल्यानंतर त्या दूर केल्या जातील. दरम्यान मस्क यांनी जाहीरपणे ज्या कर्मचाऱ्यांना काढले त्यातील अनेक कर्मचाऱ्यांना कामावर परत घेतले. त्याचबरोबर अमेरिकेतील मतदारांनी मस्क यांच्या मताला फारशी किंमत दिली नाही. त्यांनी रिपब्लिकन पक्षाला मतदान करण्याचे आवाहन केले होते. प्रत्यक्षात रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांना कमी मते मिळाली. त्यामुळे डेमोक्रॅटिक पक्षाचे अनेक उमेदवार निवडून आले आहेत.
तोपर्यंत ट्विटरच्या मुख्यालयात झोपणार
एलॉन मस्क सध्या सॅन फ्रान्सिस्को येतील ट्विटरच्या मुख्यालयात तळ ठोकून आहेत. जोपर्यंत सर्व प्रश्न सुटणार नाहीत तोपर्यंत आपण मुख्यालयातच रात्रंदिवस राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी असा प्रयोग टेस्ला कंपनीत उत्पादन वाढविण्यासाठी हे केला होता.