अरेरावी केल्याच्या निषेधार्थ इंदापुरात संघटनांकडून निषेध
रेडा (प्रतिनिधी) – लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला वैद्यकीय अधिकारी यांच्याशी इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी अरेरावीची भाषा वापरल्याच्या निषेधार्थ तालुक्यातील आरोग्य सेवकांनी सोमवार (दि.13) काळ्या फिती लावून तहसीलदार यांचा निषेध नोंदवला.
लासुर्णे केंद्रातील परिचारिकेला शनिवारी करोनाची लागण झाल्यानंतर अधिकारी व कर्मचारी इंदापूरला स्वॅबचे नमुने देण्यासाठी गेले होते. त्यांना उशीर झाल्याने माघारी पाठविले होते. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी बारामतीमध्ये स्वॅब दिले होते. इंदापूरचे पेशंट बारामतीला का गेले, यावरून मेटकरी यांनी अधिकाऱ्यांना अरेरावीची भाषा वापरली होती.
याचे पडसाद आरोग्य विभागात उमटले. मेटकरींविरोधात निषेध नोंदवत दिवसभर काळ्या फिती लावून कामकाज पाहिले. इंदापूर पंचायत समिती, कळस उपकेंद्र, बिजवडी आरोग्य केंद्र, बावडा व जिल्ह्यातील कुरकुंभ व विविध ठिकाणी तसेच राज्यात आरोग्य सेवकांनी इंदापूरच्या तहसीलदारांचा निषेध नोंदवला असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधीक्षिका डॉ. सुरेखा पोळ यांनी दिली.
पालकमंत्री यांच्याकडून मिळालेल्या सूचना, मी करोना आपत्ती व्यवस्थापन प्रमुख या नात्याने कर्मचाऱ्यांना देत होते. याबाबत मी कोणालाही अपशब्द वापरला नाही, त्यांचे म्हणणे काहीही असेल त्यांनी ते सिद्ध करून दाखवावे.
– सोनाली मेटकरी, तहसीलदार, इंदापूर