नागठाणे – गणेशवाडी (ता. सातारा) येथे वीज वितरण कंपनीचे 33/11 के.व्ही. उपकेंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यामुळे गावठाण क्षेत्र तसेच शेतीसाठी लागणारा वीजपुरवठा सुरळीत होणार आहे. नागठाण्यापासून नजीक असणाऱ्या गणेशवाडी येथे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून 33/11 के.व्ही. उपकेंद्राची उभारणी करण्यात आली आहे.
सुमारे तीन कोटी रुपये खर्च करून नागठाणे वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता अजित ढगाले यांच्या मार्गदर्शनाखाली हे वीज उपकेंद्र उभारण्यात आले आहे. गेले सहा महिने त्याचे काम सुरू होते. या उपकेंद्राच्या ट्रान्सफॉर्मरची क्षमता पाच एम. व्ही. ए. इतकी आहे. या आधी परिसरात 11 के. व्ही. सातारा व 11 के. व्ही. खोजेवाडी या वाहिन्यांद्वारे वीजपुरवठा केला जात होता.
मात्र वीजदाब वाढल्यास वारंवार वीजपुरवठा खंडित होत होता. सध्याच्या या नवीन योजनेमुळे चालू असलेली सिंगल फेज योजना बंद करण्यात येणार आहे. शेतीपंपाचा व गावठाणचा वीजपुरवठा वेगवेगळ्या वाहिनींवरून उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे गावठाणात तीन फेज वीज 24 तास अखंडितपणे उपलब्ध होणार आहे.
शेतीपंपाचा वीज पुरवठा नियोजित वेळापत्रकाप्रमाणे अखंडितपणे देण्यात येईल. उच्च ट्रान्सफॉर्मर क्षमतेमुळे सासपडेकडे जाणारे दोन फिडरही चालू करण्यात येणार आहेत. या योजनेचा फायदा नागठाण्यासह गणेशवाडी, सासपडे, करंजोशी, जांभळेवाडी, आष्टे पुनर्वसित आदी गावांना मिळणार आहे.
बोरगाव तसेच अपशिंगे (मिलिटरी) येथे दर वेळी सातत्याने होणारी वीजपुरवठ्याची समस्याही आता संपणार आहे. पूर्वी ज्या समस्यांना वीज वितरणला सामोरे जावे लागत होते ते आता लागणार नाही, अशी माहिती नागठाणे वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता अजित ढगाले, कार्यकारी अभियंता सुनीलकुमार माने आणि उपकार्यकारी अभियंता (सातारा ग्रामीण) प्रशांत वाघ यांनी दिली.