जामखेड तालुक्‍यात विजेचा खेळखंडोबा सुरूच

चार दिवसांपासून अनियमित वीजपुरवठा ः नागरिकांचा आंदोलनाचा इशारा
जामखेड  (प्रतिनिधी) –जामखेड शहरासह तालुक्‍यातील काही गावामध्ये महावितरण विभागाकडून विजेचा खेळखंडोबा सुरूच असून रात्री अपरात्री कधीही वीज जात असल्याने नागरिक चांगलेच वैतागले आहे.

शहरात वीज बिल वसुलीचे प्रमाण चांगले असून थकबाकी अत्यल्प आहे. या स्थितीत शहराला अखंडित वीजपुरवठा करण्याची जबाबदारी टाळून भारनियमन कधी, ठेकेदाराने परस्पर वीजपुरवठा खंडित केला, कधी वीज दुरुस्तीच्या नावाखाली वीजपुरवठा खंडित केला जात आहे. अशी एकना अनेक कारणे सांगत कोणतेही नियोजन न करता शहरातील वीज पुरवठ्याचा खेळखंडोबा करणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ आणि कनिष्ठ अधिकाऱ्यांनी या सर्व प्रश्नांची वेळीच दखल घेवून वीजपुरवठा पूर्ववत सुरु ठेवावा, अन्यथा वीज ग्राहकांना आंदोलन उभारावे लागेल, असा इशारा नागरिकांनी दिला. या परिसरात दिवसभर विजेचा खेळखंडोबा सुरू असल्याने नागरिक संतप्त झाले असून रस्त्यावर उतरण्याची भाषा करीत आहेत. महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर नागरिकांनी आपला राग काढत आहे.

ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्याने या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र वीज न आल्याने येथील लोक संतप्त झाले. काही दिवस विजेचा खेळखंडोबा सुरू असल्याची तक्रार करण्यात आली आहे. उन्हाळा सुरू असतानाच वीज खंडित होत असून रात्री-बेरात्री कधीही वीज जाते. त्यामुळे नागरिकांना रात्रभर झोपता येत नाही. ज्येष्ठ नागरिक, पेशंट व लहान मुले यांचे तर अधिक हाल होतात. वीज वारंवार खंडित होत असल्याने विजेवर चालणाऱ्या उपकरणांवरही त्याचा परिणाम होतो. विजेचा हा खेळखंडोबा सुरू असला तरी वीज बिले मात्र वाढीव येत आहेत, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

शहरातील वीजपुरवठा अनेकवेळा खंडित केला असून त्याची योग्य कारणे सांगण्यासाठी कोणीही सक्षम अधिकारी जबाबदारीने पुढे येत नाही तर कार्यालयात ग्राहक तक्रार निवारणासाठी उपलब्ध असलेल्या दूरध्वनीवर थातुरमातुर उत्तरे देवून वीजग्राहकांचा उपमर्द करण्यात धन्यता मानणारे कर्मचारी ग्राहकांच्या सोशिकतेचा अंत पहात असल्याचे आढळून येते. सध्या कार्यालये ओस पडली असून वायरमन, लाइनमन, डेप्युटी इंजिनिअर यांची संख्याही खूपच कमी असल्यामुळे लोकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. भरमसाठ बिलांची आकारणी, ग्राहकांना बिले वेळेवर न मिळणे; त्यामुळे भरावा लागणारा दंड अशा समस्यांचा त्यात समावेश आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)