डिस्चार्ज बॅटरी घेऊन चार्ज केलेली बॅटरी देण्याचा प्रयोग
नवी दिल्ली – देशात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढावी म्हणून प्रयत्न करण्यात येत आहेत. या वाहनांची बॅटरी चार्ज करण्यास बराच वेळ लागतो. यामुळे या मोहिमेत अडथळे निर्माण होत आहेत. मात्र, वाहनधारकांची डिस्चार्ज झालेली बॅटरी परत देऊन पूर्ण चार्ज झालेली बॅटरी वाहन धारकाला देण्याचा प्रयोग इंडियन ऑईल कॉर्पोरेशन करीत आहे.
या बॅटरीच्या देवाणघेवाणीला केवळ दोन मिनिटांचा वेळ लागतो. कॉर्पोरेशनने हा प्रयोग चंदिगडमध्ये केला आहे. हळूहळू देशातील 20 पेट्रोल पंपावर हा प्रयोग सुरू होईल, असे कंपनीचे अध्यक्ष संजीव सिंह यांनी सांगितले.
हा प्रयोग सध्या फक्त व्यावसायिक वाहनासाठी चालू आहे. त्यामध्ये ऑटोरिक्षाचा समावेश आहे. अशा स्टेशनवर इलेक्ट्रिक वाहनधारक डिस्चार्ज झालेली बॅटरी देऊन चार्ज झालेली बॅटरी 2 मिनिटात घेऊन जाऊ शकतात. इलेक्ट्रिक वाहनाच्या चार्जिंगला वेळ लागतो. त्यामुळे ही वाहने लोकप्रिय नाहीत. गेल्या वर्षी 35 लाख वाहनांची विक्री झाली. त्यामध्ये फक्त 4 हजार वाहने इलेक्ट्रिक आहेत. हा प्रश्न नावीन्यपूर्ण पद्धतीने सोडवण्याच प्रयत्न चालू आहे.