अमरावती – अमरावतीत माजी राज्यमंत्री व भाजप आमदार प्रवीण पोटे यांच्या पोटे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेटचे रंगकाम करताना चार कर्मचाऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे या घटनेला चार तास उलटूनही कोणीही मृतदेह पाहायला व नातेवाईकांचे सांत्वन करण्यासाठी आले नाही, असा आरोप मृतांच्या नेतेवाईकांनी केला. मरण पावलेल्या चारही कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात कॉलेज प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्त केला.
अक्षय सावरकर (वय 25), गोकुळ वाघ (28), प्रशांत सेलुकर (30) आणि संजय दंडनाईक (45) अशी मृतांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, पोटे इंजिनिअरिंग महाविद्यालयात रंगकाम सुरू असताना आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. गेटचे रंगकाम सुरू असताना लोखंडी शिडीचा विद्युत वाहिनीला स्पर्श झाला. यात विजेचा जोरदार झटका बसल्याने चौघांचा जागीच मृत्यू झाला.
या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या दुर्घटनेनंतर काही काळ तणाव निर्माण झाला आहे. यासंदर्भात कॉलेज प्रशासनाने कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.
दरम्यान, कॉलेजमध्ये शिपाई पदावर असताना रंगकाम कसे देण्यात आले, असा प्रश्न मरण पावलेल्या कर्मचाऱ्याच्या नातेवाईकांनी उपस्थित केला आहे. या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी व याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात यावी तसेच मृत कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना नोकरी व आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
तसेच या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयातून ताब्यात घेणार नाही व शवविच्छेदन करू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे.