मंचर -पिंपळगाव खडकी (ता. आंबेगाव) येथील महावितरण कंपनीच्या उपकेंद्रातील आयसोलेट (तांब्याच्या पट्ट्या) चोरणारा चोरटा विजेचा शॉक बसून 75 टक्के भाजलेल्या अवस्थेत मंचर पोलिसांना मिळाला. तर त्याचे इतर तीन ते चार साथीदार 75 हजार रुपये किमतीचे साहित्य घेऊन पळून जाण्यात यशस्वी ठरले. ही घटना बुधवारी (दि. 15) पहाटे घडली.
अशोक बाळू पारधी (रा. वाफगाव, ता. खेड) असे या चोरट्याचे नाव आहे. मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास पिंपळगाव उपकेंद्रात तीन ठिकाणी असणारे आयसोचे व आर्थिंग ब्लेड तसेच 132 केवी काठापूर व 132 केवी कवठेयेमाई (ता. शिरुर) या वाहिनीच्या आर्थिंगचे ब्लेड असणारे तांब्याचे रॉड चोरीस गेले आहेत. त्याचे साथीदार पळून गेले आहेत.
28 हजार रुपये किमतीचे आठ नग 33 केव्ही असो लेटर ब्लेड, 31 हजार 500 रुपये किमतीचे नऊ नग ते तीस केवी अर्थ ब्लेड, 15 हजार रुपये किमतीचे सहा नग 132 केव्ही अर्थ ब्लेड असा एकूण 74 हजार 500 रुपयांचा चोरीस गेला आहे. पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी सागर गायकवाड यांनी पंचनामा केला आहे. पिंपळगाव उपकेंद्राचे उपकार्यकारी अभियंता देवेंद्र राजेंद्र पाटील यांनी येथील चोरीची फिर्याद दिली आहे.