- पालिकेकडून प्रशासकीय प्रशिक्षण सुरू
पुणे – करोना लसीकरणासाठी शहरात निवडणूक प्रक्रिया पॅटर्न राबविण्यात येणार आहे. त्यानुसार, निवडणुकीत ज्या प्रमाणे मतदार यादी, बुथ, तसेच मतदानासाठी केंद्रावर गेल्यानंतर ओळखपत्र तपासणी करून मतदार निश्चित केला जातो. त्याचप्रमाणे लसीकरणासाठी शहरात 100 जणांची एका बॅच केली जाणार आहे. त्यासाठी बुथ असून केंद्र शासनाकडील नोंद तसेच त्यांना आधारकार्ड सक्तीचे असणार आहे.
भारतात लसीकरणासाठी तीन कंपन्यांनी तातडीची परवानगी मागितली आहे. तर, केंद्राकडूनही डिसेंबर अखेरपर्यंत देशाला लस मिळेल असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे केंद्राकडून लसीकरणाच्या शितसाखळ्या उभारण्यासाठी स्थानिक पातळीवर लसीकरण कशा पद्धतीने करावे त्याची रचना कशी असावी याबाबत निर्देश दिले.
हे निर्देश केंद्राकडून प्राप्त झाल्यानंतर राज्य शासनाने ते महापालिकेस दिले असून ज्याप्रमाणे निवडणूक मतदान प्रक्रिया राबविली जाते. त्याच धर्तीवर शहरातही हे लसीकरण केले जाणार आहे. त्यासाठी पालिकेकडून 40 डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात आले असून हे डॉक्टर आता उर्वरीत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणार आहेत.
दरम्यान, केंद्राकडून पहिल्या टप्प्यात शासकीय तसेच खासगी वैद्यकीय कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. त्यासाठी आतापर्यंत 48 हजार जणांची नोंदणी झाली आहे.