बार्सिलोना -लिओनेल मेस्सीच्या अप्रतिम गोलमुळे बार्सिलोना संघाने स्पॅनिश लीग फुटबॉल स्पर्धेतील सलग पराभवांची मालिका खंडित केली. सोमवारी झालेल्या सामन्यात त्यांनी लेव्हेंट संघावर 1-0 अशी मात केली.
या स्पर्धेत याआधी झालेल्या दोन्ही सामन्यांत बार्सिलोनाला पराभवाचा सामना करावा लागला होता. या स्पर्धेत मेस्सीचा खेळ सातत्याने सुमार होत होता. युव्हेंट्सविरुद्धच्या सामन्यातही त्याला आपल्या दर्जानुरुप कामगिरी करता आली नव्हती. या सामन्यात मात्र, त्याने अपयश बाजूला टाकत अप्रतिम गोल केला.
बार्सिलोना संघाला घरच्या मैदानावर खेळण्याचाही लाभ झाला. या सामन्यातील पहिला हाफ गोलशून्य बरोबरीत सुटला. दुसरा हाफ सुरू झाल्यावरही दोन्ही संघांचे गोल करण्याचे सर्व प्रयत्न फोल ठरले. मात्र, मिळालेल्या एका संधीचे सोने करताना मेस्सीने 76 व्या मिनिटाला गोल केला व बार्सिलोनाला महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. मेस्सीचा हाच गोल सामन्यातील एकमेव गोल ठरला व त्याच्या जोरावर बार्सिलोनाचा विजय साकार झाला.
स्पर्धेतील अन्य सामन्यात रेयाल माद्रीदने ऍटलेटिको माद्रीद संघाचा 2-0 असा पराभव केला.
रेयाल माद्रीदच्या कॅसेमिरोने 15 व्या मिनिटाला गोल केला.दुसऱ्या हाफमध्ये ऍटलेटिकोचा गोलरक्षक जॅन ओबलॉकडून 63 व्या मिनिटाला स्वयंगोल झाल्याने रेयाल माद्रीदचा विजय निश्चित झाला.
या विजयामुळे रेयाल माद्रीदने क्रमवारीत तिसरे स्थान मिळवताना विजेतेपदाची दावेदारीही आणखी भक्कम केली. ऍटलेटिकोने या स्पर्धेत सलग 26 लढतीत अजिंक्य राहण्याची कामगिरी केली होती. त्यांची विजयी घोडदौड या सामन्यात खंडित झाली.