पुणे – लसीकरणासाठी आरोग्यखात्याचा पुणे विभाग सज्ज झाला आहे. त्यासाठी साठवण क्षमता असणारी उपकरणेही तयार ठेवली आहेत. त्यामध्ये लसीकरण स्टोअर, शीतकरणासाठी फ्रीज यांचा समावेश आहे. 27 लाख लसींची साठवणूक यामध्ये करता येणार आहे. पुणे विभागातील पुण्यासह सोलापूर आणि सातारा या तीन जिल्ह्यांमध्ये हे सुविधा उपलब्ध केली आहे.
डॉक्टर, परिचारिका, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, औषध निर्माण अधिकारी (फार्मासिस्ट), तंत्रज्ञ (टेक्निशियन्स) यांच्यापासून ते सफाई कर्मचारी, सुरक्षा रक्षक यांना पहिल्या टप्प्यात लस देण्यात येणार आहे. लाखोच्या संख्येने निर्माण होणारी ही लस साठवण्यासाठी शीतकरण केंद्राची सुविधा हवी असते. ती पुण्यासह जिल्ह्यात उपलब्ध करण्यात आली आहे.
लसीचे 10 लाख डोस मावतील एवढी, तर पुणे विभागात (पुणे, सातारा व सोलापूर) 27 लाख डोसेस मावतील इतकी शीतकरण क्षमता पुण्याच्या आरोग्य उपसंचालक कार्यालयाच्या औंध येथील विभागीय संग्रहालयात (स्टोरेज) उपलब्ध आहे.
सुरवातीला या ठिकाणी लसीचे डोस येतील आणि येथून ते पुण्यासह सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांत वितरित होतील. विशेष म्हणजे आरोग्य विभागाकडून नेहमीचे लसीकरण करण्यात येते. ते डोस वगळता ही 27 लाख डोसेसची अतिरिक्त क्षमता असल्याचे पुणे परिमंडळचे आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख यांनी सांगितले.