नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टीकडून येत्या २९ फेब्रुवारी रोजी लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. मात्र पक्षाने त्यापूर्वीच विविध ठिकाणी निवडणूक कार्यालयेही सुरू केली आहेत. किंबहुना उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांत अशी कार्यालये सुरू झाली असून अन्य पक्षांच्या तुलनेत आमची अधिक तयारी असल्याचा संदेशच यातून या पक्षाला द्यायचा असल्याचे मानले जाते आहे.
दरम्यान, कार्यालये सुरू होत असली तरी भाजपच्या विद्यमान खासदारांच्या मनात एकप्रकारची धाकधुक असल्याची माहिती एका इंग्रजी वर्तमानपत्रातील कॉलममध्ये करण्यात आली आहे. त्याचे कारण म्हणजे ज्या ठिकाणी पक्षाची निवडणूक कार्यालये सुरू झाली आहेत तेथे कार्यालयांतून उमेदवारांची अथवा विद्यमान खासदारांचीच नावे गायब आहेत.
तेथे फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे सरकार असेल तर त्या राज्यांतील मुख्यमंत्री आणि सरकार नसेल तर त्या राज्यांतील प्रदेशाध्यक्ष यांचेच फोटो आणि नावे आहेत. त्यामुळे उमेदवारी मिळण्याबाबतही खासदार कमालीच्या अस्वस्थतेत आहेत. दरम्यान, कार्यालये इतक्या अगोदरच सुरू करण्याच्या संदर्भात असा दावा करण्यात आला आहे की संपूर्ण निवडणूक भाजपला सेंट्रलाइज करायची आहे किंवा एककेंद्री अशा स्वरूपाची करायची आहे.
भाजप हा शहरी मतदारांचा पक्ष असल्याची प्रतिमा आहे. मोदी सरकारच्या दहा वर्षांच्या राजवटीत पक्षात बाहेरून बरीच आयात झाली आहे. ग्रामीण भागातही काम करून पकड निर्माण करण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक केले गेले आहेत. मात्र अजुनही शेतकऱ्यांचा एक मोठा वर्ग पक्षावर नाराज आहे. त्यामुळे ग्राम परिक्रमा यात्रा सुरू करून शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला जातो आहे. त्यासाठी १२ फेब्रुवारी रोजी यात्रा सुरू करण्यात आली असून ती १२ मार्चपर्यंत चालणार आहे. यात्रेत सव्वालाख गावांतील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला जाणार आहे.