– नीलकंठ मोहिते (प्रतिनिधी)
इंदापूर : इंदापूर कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे संचालक, भगवानराव भरणे सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष मधुकर भरणे यांची इंडियन फार्मर्स फर्टीलायझर को ऑपरेटिव्ह ( इफको ) नवी दिल्ली च्या जनरल बॉडीच्या राष्ट्रीय सदस्यपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
इंदापूर कृषी उत्त्पन्न बाजार समिती व इंदापूर येथील रमा फर्टीलायझर्सच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील लाखो शेतकऱ्यांच्या संपर्कात असलेल्या मधुकर भरणे यांना राष्ट्रीय स्तरावर संचालक पद मिळाले असल्याने, इंदापूर तालुक्यातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
इफको जगभरातील ४९ देशांमध्ये ९५ ऑपरेशन्स चालवते. १२ हजारहून अधिक लोकांना रोजगार देते. त्याची उत्पादने पाच खंडापर्यंत पोहोचलेले आहेत. एकूण ८० पेक्षा अधिक ब्रँडमध्ये त्यांची भागीदारी व गुंतवणूक आहे. जगाच्या मध्य व पूर्वेतील मुख्य आणि सर्वात वैविध्यपूर्ण समूह म्हणून इफकोचे नावलौकीक आहे.
इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड ही एक सहकारी संस्था असून, भारत सरकारने १९६७ साली याची स्थापना केली होती. भारतीय शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किंमतीत उच्च दर्जाची खते उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ह्या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.
याच संस्थेच्या राष्ट्रीय स्तरावर संचालकपदी राज्यातील इंदापूर तालुक्याला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली असल्याने, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.