ELECTION COMMISION ACTION ON NCP – निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात झालेल्या राजकीय भूकंपावर निर्णय देताना एकनाथ शिंदे यांना शिवसेना हा पक्ष व धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह बहाल केले होते. निवडणूक आयोगाच्या निकालामुळे ठाकरेंची शिवसेना शिंदेंची झाली. निवडणूक आयोगाच्या या निकालावर ठाकरे समर्थकांनी जोरदार आक्षेप नोंदवला होता तर शिंदे गटाकडून समर्थन करण्यात आले होते. ठाकरेंकडून शिवसेना काढून घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दणका दिला आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय पक्ष हा दर्जा काढून घेतला आहे.
राष्ट्रीय दर्जा कधी मिळतो?
लोकसभेच्या चार जागा जिंकण्याबरोबरच चार किंवा त्यापेक्षा जास्त राज्यांमध्ये एकूण मतांच्या सहा टक्के मते मिळवणे आवश्यक
किंवा तीन राज्यांमध्ये लोकसभेच्या दोन टक्के जागा जिंकणे बंधनकारक.
किंवा चार राज्यांमध्ये पक्षाला प्रादेशिक किंवा राज्य पक्षाचा दर्जा आवश्यक.
निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा का काढून घेतला?
एखाद्या पक्षाला राष्ट्रीय दर्जा बहाल करताना निवडणूक आयोगाने वरील नियम घालून दिले आहेत. या नियमांची एखादा पक्ष पूर्तता करू शकत नाहीये असं लक्षात आल्यानंतर निवडणूक आयोग त्या पक्षाला नोटीस धाडून बाजू मांडण्यास सांगतो. त्या पक्षातर्फे समाधानकारक उत्तर न मिळाल्यास त्या पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द करण्यात येतो.
या पक्षांवरही डोळा
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोबतच निवडणूक आयोगाच्यावतीने याआधी मायावती यांचा बसप, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि तृणमूल काँग्रेस यांनाही 2019 साली निवडणूक आयोगाकडून नोटीस बजावण्यात आली होती. त्या वर्षीचा लोकसभा निवडणुकीतील संबंधित पक्षाची कामगिरी पाहता राष्ट्रीय पक्षाचा दर्जा का काढून घेऊ नये असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. सध्यातरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा निवडणूक आयोगाने काढून घेतल्याचे वृत्त आहे.