पुणे: आठ वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला जन्मठेप आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश ए.व्ही.रोट्टे यांनी सुनावली.
मनसुखलाल प्रल्हाद शर्मा (वय 30, रा. राजस्थान) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत पीडितेच्या आईने विश्रांतवाडी पोलिसात फिर्याद दिली आहे. एप्रिल 2016 मध्ये हा प्रकार घडला. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील सुनील हांडे यांनी काम पाहिले. त्यांनी 9 साक्षीदार तपासले. त्यामध्ये पीडितेची साक्ष आणि वैद्यकीय पुरावा महत्त्वाचा ठरला.
शर्मा खेळण्याच्या बहाण्याने तिला घरात घेऊन गेला. तिच्यावर बलात्कार केला. त्यावेळी ती ओरडली. त्यावेळी कोणाला काही बोलू नको, असे तो तिला बोलला. तिने याबाबत 10 वर्षाची चुलत बहिण आणि आजीला सांगितले. त्यानंतर फिर्यादीने तिला विश्वासात घेऊन याबाबत विचारणा केली. त्यावेळी तिने घडलेला प्रसंग सांगितला. त्यानंतर याबाबत पोलिसात फिर्याद देण्यात आली.
पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यावेळी ही घटना गंभीर स्वरूपाची आहे. आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी ऍड. सुनील हांडे यांनी केली. घटना घडली, त्यावेळी आरोपी जागेवर नव्हता, असा बचाव आरोपीच्या वतीने घेण्यात आला. मात्र, डीएनए चाचणी सकारात्मक असल्याचे हांडे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.