पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुढील आर्थिक वर्षाचे प्रस्तावित उत्पन्न व खर्च दर्शविणारे अंदाजपत्रक सादर करण्यास सर्व धर्मादाय संस्थांना अवघे आठ दिवस राहिले आहे. त्यामुळे हे अंदाजपत्रक तत्काळ तयार करून धर्मादाय आयुक्त कार्यालयात सादर करावे, असे आवाहन धर्मादाय कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त कायदा १९५०च्या नियम १६ (अ) नुसार, वार्षिक उत्पन्न पाच हजार रुपयांपेक्षा जास्त असलेले सर्व नोंदणीकृत धार्मिक ट्रस्ट आणि संस्थांना पुढील आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक सादर करावे लागते. यासाठी दि. २८ फेब्रुवारीपर्यंत हे अंदाजपत्रक सादर करण्याची मुदत आहे,
त्यामुळे एक एप्रिलपासून सुरू होणाऱ्या संपूर्ण आर्थिक वर्षामध्ये संस्थेच्या मालमत्तेमध्ये होणारी वाढ अथवा विक्रीद्वारे येणारी रक्कम, उद्दिष्टनिहाय तसेच प्रशासकीय खर्चासाठीची तरतूद, संस्थेच्या विशेष उपक्रमांचे आर्थिक नियोजन, संस्थेची देणी, कर्जफेड याबाबतच्या आर्थिक नियोजनाची माहिती या अंदाजपत्रकात द्यावी लागते.
ट्रस्टच्या नावे बँकेतील ठेवी, त्यावरील व्याज, गुंतवणूक व त्यावरील परतावा, खासगी देणग्या, सीएसआर प्रकल्पांद्वारे मिळणारी मदत, परकीय चलनातील देणग्या, शासकीय अनुदान अशा सर्व उत्पन्न स्त्रोतांची माहिती नमूद करावी लागते. यासोबतच संस्थेच्या कार्यरत विश्वस्तांची नावे आणि त्यांनी हे पुढील वर्षाचे अंदाजपत्रक मान्य केल्याचा ठराव सोबत जोडावा लागतो. संपूर्ण माहिती विश्वस्त कायद्याच्या ‘परिशिष्ट ७ अ’मध्ये छापील नमुन्यात भरून दि. २८ फेब्रुवारीपर्यंत संबंधित धर्मादाय कार्यालयांच्या लेखा शाखेमध्ये जमा करून त्याची पोहोच घ्यावी लागणार आहे.
शहरातील सर्व धर्मादाय संस्था आणि ट्रस्ट यांनी आपल्या सनदी लेखापरीक्षकाशी संपर्क साधून अंदाजपत्रक दाखल करण्याची वेळेत पूर्तता करावी. – अड. शिवराज कदम जहागिरदार, माजी अध्यक्ष, प्िबलक ट्रस्ट प्रक्टिशनर्स असोसिएशन, पुणे