शेवगाव, (प्रतिनिधी) – शेवगाव नगरपरिषदेने थकबाकी वसुलीसाठी कडक पाऊले उचलत एक पेट्रोल पंप व मंगल कार्यालय सील केले आहे.पेट्रोल पंपाकडे एक लाख ३७ हजार ४१ ८ रुपये तर मंगल कार्यालयाकडे ८ लाख ४६ हजार ३३३ रुपये थकबाकी आहे.
लोकसभा निवडणुका लवकरच येऊ घातल्या आहे. निवडणूक आचारसंहितेचा भाग म्हणून अधिकारी वर्गाच्या जिल्हयाबाहेर बदल्या होतात. याच कारणास्तव शेवगाव नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन राऊत यांची मालेगावला सहाय्यक आयुक्त म्हणून बदली झाली आहे.
राऊत येथे कार्यरत असताना अतिशय मितभाषी होते. म्हणूनच त्यांचेवर अनेकदा टीका होत असे. त्यांच्या या मितभाषी स्वभावामुळेच नगर परिषदेच्या वसुलीला फटका बसला. नगरपरिषदेच्या तिजोरीत कायम खडखडाट असल्याने विकासकामे ठप्प असायची. एवढेच काय पण नगरपरिषदेच्या नोकरदाराचे पगारही कायम प्रलंबित राहिले आहेत. मात्र याच राऊत यांनी आपला कार्यभार हस्तांतरित करण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी (दि.२१ ) थकबाकी वसुलीसाठी सील ठोकण्याची कारवाई करण्याचे आदेश पारित करून थकबाकीदारांना ‘जोरका धक्का धिरेसे लगे ‘ चा अनुभव देऊन त्यांची त्रेधा उडवून दिली. नगरपरिषदेची तिजोरी वजनदार करण्याला चालना दिली.
शेवगाव नगरपरिषदेची विविध व्यावसायिक व खातेदाराकडे करापोटी दहा अकरा कोटींवर थकबाकी आहे. ही वसुली वेळच्यावेळी होऊ शकली नाही. त्यामुळे अनेक कामे रेंगाळली आहे. पगारही वेळच्या वेळी होऊ शकत नाहीत. अशा अवस्थेत राऊत यांनी जाताजाता नगर परिषद अधिनियम १९६५ चे कलम १५२ नुसार नोटीस देऊन येथील पैठण रस्त्यावरील अनुराग पेट्रोल पंप व नेवासे रस्त्यावरील शिवम गार्डन मंगल कार्यालय सील करण्याची धडक कारवाई केली. अन्य थकबाकीदारांनी आपली थकबाकी भरून नगरपरिषदेला सहकार्य करावे. आपलेवरील संभाव्य कारवाई टाळावी असे आवाहन केले.
पेट्रोल पंपाकडे एक लाख ३७ हजार ४१ ८ रुपये तर मंगल कार्यालयाकडे ८ लाख ४६ हजार ३३३ रुपये थकबाकी आहे. नगरपरिषदचे कार्यालयीन अधीक्षक भाऊसाहेब जोगस, करनिरीक्षक शिरसाठ, अशोक सुपारे, अनिल लांडे, राजू साळवे, बाळू ढाकणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.