नांदेड – येथे अत्यंत भीषण अपघात शुक्रवारी घडला. वडिलांना उपचारासाठी घेऊन जात असतांना आयशर गाडीने दुचाकीला धडक दिली. या अपघातात पिता-पुत्रांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात शहरातील आसना ब्रिज जवळ घडला आहे. (Eicher hit a bike; Father and son died in a terrible accident)
दाजीबा गाढे (वय- ६५) आणि गोपीनाथ गाढे (वय- ४०) असे पिता-पुत्राचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मयत हे नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील भोगाव येथील रहिवासी आहेत.
गोपीनाथ गाढे हे आपल्या वृद्ध वडिलांना रुग्णालयात नेण्यासाठी दुचाकीने नांदेड शहराकडे जात होते. सकाळी सहा वाजेच्या सुमारास आसना उड्डाण पुलामार्गे हे पिता-पुत्र शहराकडे येत होते. आसना ब्रिजजवळ येताच समोरून भरधाव वेगाने येत असलेल्या आयशर टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिली.
अपघात एवढा भीषण होता की टेम्पोच्या धडकेनंतर दाजीबा गाढे हे उड्डाण पूलावरून थेट खाली कोरड्या नदी पात्रात कोसळले. तर गोपीनाथ गाढे हे दुचाकीसह फरकटत गेले. दोघांना गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.
अपघातानंतर आसना ब्रिज वर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. घटनेनंतर आर्धापूर पोलीस आणि विमानतळ पोलिसांनी धाव घेतली. दोघा पिता पुत्राना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.