मंचर – करोना व्हायरस हा अंडी, चिकन, मटन, मच्छीतून पसरत नसल्याचे पशुसंवर्धन विभागाने वारंवार स्पष्ट केले असले तरी मांसाहार करण्यासाठी खवय्ये धजवत नसून, अंड्यांच्या बाजारभावांमध्ये घसरण सुरूच आहे. सद्यःस्थितीला अंड्यांचा बाजारभाव शेकडा 370 ते 380 रुपये दरम्यान आहे.
आंबेगाव तालुक्यातील अंडी उत्पादक शेतकरी सागर प्रकाश तापकीर, कांताराम टाव्हरे, नितीन बारवे, मुकुंद बारवे, गोविंद थोरात, संदीप कानडे, राजेंद्र कानडे, तुषार कानडे, नरेन कानडे, योगेश कानडे आदी शेतकऱ्यांनी कोट्यवधी रुपये खर्च करून कोंबड्यांच्या शेडची निर्मिती केली आहे; परंतु बाजारभावच नसल्याने अंड्यांना मागणी नाही.
व्यापारीही खरेदीला येत नसल्याने अंड्याची नाईलाजास्तव साठवणूक करावी लागते,
त्यामुळे दररोज लागणारे खाद्य आणि आर्थिक भांडवलाचा प्रश्न उभा राहिला आहे. अंड्याचे बाजारभाव गेल्या पंधरा दिवसांपूर्वी शेकडा 455 रुपये होते.
या बाजारभावात शेकडा पन्नास रुपयांनी वाढ झाली होती; परंतु आता गेल्या आठवड्यात बाजारभावामध्ये शेकडा 70 ते 80 रुपयांनी घसरण झाली आहे, यामुळे अंडी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
करोना व्हायरसबद्दल चुकीच्या अफवांचे खंडन पशुसंवर्धन विभागाने वारंवार करूनही अंड्याचे बाजारभाव मात्र वाढण्यास तयार नाही. सद्यस्थितीला अंड्यांचा बाजारभाव शेकडा 370 ते 380 रुपये मिळत आहे. मुद्दल खर्चही वसूल होत नसल्याने अंडी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
– अतुल बांगर, पोल्ट्री चालक, फाकटे
सायबर क्राइमअंतर्गत गुन्हे दाखल
करोना व्हायरसबद्दल चुकीची अफवा पसरल्याने नागरिकांनी अंडी, चिकन, मटण, मच्छी यांसारखे मांसाहारी पदार्थ खाणे तुर्त तरी टाळले आहे. करोना व्हायरसबद्दल चुकीचे मेसेज, अफवा आणि व्हीडीओ समाज माध्यमांतून पसरल्यामुळे बहुतांश ठिकाणी पोल्ट्री चालक आणि कंपन्यांनी गुन्हे दाखल केले आहेत.
अंडी उत्पादांना हमीभव द्यावा
अंडी उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने शासकीय अनुदान व योग्य हमीभाव देणे गरजेचे आहे. अंडी खाण्याने करोना होत नाही, त्यामुळे अंडी खाण्यास काहीच हरकत नसल्याचे पोल्ट्री व्यवसायातील तज्ज्ञ डॉ. अजित रानडे, शफीभाई मोमीन, जावेद मिस्त्री, इम्रान मोमीन, इसाक शेख यांनी सांगितले.