सातारा – मराठा आरक्षणप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज महत्वपूर्ण भाष्य केले आहे. मराठा आरक्षणामुळे रखडलेली सर्वच शैक्षणिक प्रवेशप्रक्रिया लवकर सुरु होणार असून यासंदर्भातील अध्यादेश काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
कराड येथे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त अजित पवार यांनी प्रीतिसंगम याठिकाणी त्यांच्या समाधी स्थळावर पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी ते बोलत होते.
अजित पवार म्हणाले कि, अकरावीच्या प्रवेशाबाबत लवकरच अध्यादेश काढला जाईल. सर्वोच्च न्यायालयाने ९ सप्टेंबर रोजी मराठा आरक्षणाला स्थगिती दिली. त्यामुळे ९ सप्टेंबरपूर्वी जे प्रवेश झाले आहेत ते एसईबीसीच्या पद्धतीने होतील.
मात्र, त्यानंतरच्या प्रवेशांबाबत आम्ही विधी व न्याय विभागाशी, अॅडव्होकेट जनरलशी तसेच अॅड. थोरातांशी चर्चा केली आहे. त्यानंतर दोन-तीन दिवसांतच सरकारचा निर्णय अध्यादेशात काढण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.