वाहतुकीने स्वारगेटचीच ‘कोंडी’, पुणेकरांच्या डोक्याला ताप

पुणे – स्वारगेटच्या मुख्य चौकात वाहतूक कोंडी हा नित्याचाच प्रश्न झाला आहे. स्वारगेटहून कात्रजकडे जाणाऱ्या रस्त्यावर मेट्रोने बॅरिकेडिंग केले आहे. यातच एसटी आणि पीएमपी बसेसच्या रांगा आणि खासगी वाहनांची गर्दी यामुळे केवळ गर्दीच्या वेळातच नव्हे, तर भर दुपारीदेखील कोंडी होत आहे.

 

कात्रज रस्त्यावरील एसटी आगाराजवळ मेट्रोचे काम सुरू आहे. तीन मार्गांनी चौकात येणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी, चौकात उभ्या असणाऱ्या रिक्षा, आगारात जाणाऱ्या बसेस आणि बीआरटी लेनकडे वळणाऱ्या बसेस यामुळे ही कोंडी होत आहे.

 

मेट्रोच्या कामामुळे सातारा रस्त्याच्या डाव्या बाजूने जाणाऱ्या पीएमपीच्या बसेस सध्या बीआरटी लेनमधून सोडण्यात येत आहेत. यासह एसटी आगारामध्ये जाणाऱ्या एसटी बसेसच्या रांगा लागत आहेत. इतकेच नव्हे तर, हडपसर, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता या रस्त्याने येणारे खासगी वाहनचालक येतात. त्यामुळे कोंडीत भर पडते. यापूर्वी सातत्याने सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी कोंडी होत होती. मात्र, आता दिवसभर कोंडीचा सामना करावा लागत आहे.

 

बीआरटी लेनमधून सध्या कात्रजकडे बसेस जात आहेत. याशिवाय शहरातील कोअर सेवेच्या बसेस देखील बीआरटी लेनमध्ये थांबतात. बसेसची रांग तयार होऊ नये आणि वाहतुकीला अडथळा येऊ नये, यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यामुळे थांबणाऱ्या बसेस आणि कात्रजच्या दिशेने जाणाऱ्या बसेसचे योग्य नियोजन करण्यात येणार आहे.

– दत्तात्रय झेंडे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी

एसटी आगाराच्या एन्ट्री गेटजवळ मेट्रोचे काम सुरू असल्याने, सातारा रस्त्याने काही बसेस बाहेर पडत आहेत. परंतु, अनेक रिक्षाचालक स्थानक आवारात थांबत आहेत. एसटी बसेस आगारात येताना एका पाठोपाठ एक आल्यास रांग लागत आहेत. परंतु, सध्या बसेसचे प्रमाण कमी आहे.

– सचिन शिंदे, आगार व्यवस्थापक (एसटी), स्वारगेट

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.